६-६-१९५० बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माला आव्हान - Page 254

२१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात यावे असे ज्यांना ज्यांना वाटते, त्यांच्यापुढे असा प्रश्न उभा राहतो की, बौद्ध धर्मात जर काही चिरंतन मूल्ये होती तर या धर्माचा ऱ्हास कसा झाला? या संबंधीची माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत मी जमविलेल्या माहितीप्रमाणे, बौद्ध धर्माच्या उदय-अस्ताबद्दल जी अनुमाने मी बसविली आहेत ती जवळ जवळ बरोबर आहेत असेच मला वाटते.

भारतात प्रथमपासून हिंदू धर्म होता असा बहुतेकांचा समज आहे. परंतु इतिहासाच्या आधारावर या घटनेची छाननी केली तर हा समज टिकाव धरु शकत नाही. हिंदू धर्म भारतात प्रथमपासून मुळीच नव्हता. हिंदू धर्माची आज- मितीची स्थिती पाहता, तो अगदी अलिकडे निर्माण झाला आहे असेच दिसून येते. हिंदू धर्माची उभारणी रिथत्यंतरातून झालेली आहे. प्रथमतः भारतात वैदिक धर्म होता. त्यानंतर ब्राह्मणी धर्म आला आणि आता शेवटी हिंदू धर्म निर्माण झाला. अशातऱर्‍्हेचे बदल क्रमशः घडलेले आहेत.

ब्राह्मणी धर्माच्या काळातच बौद्ध धर्माचा उदय झाला आणि ती अवस्था स्वाभाविक होती. ब्राह्माणी धर्माचा आत्मा विषमतेचा होता; तर बौद्ध धर्माचा आत्मा समतेचा होता. अर्थात, या दोन भिन्न विचार प्रणालीच्या धर्मात संघर्ष होणे अपरिहार्यच आहे. बौद्ध धर्म हा ब्राह्मणी धर्माला आव्हानासारखा होता; कारण बौद्ध धर्माचा चातुर्वर्ण्य पद्धतीस विरोध होता. फ्रेंच राज्यक्रांतीने समता प्रस्थापनेचे जे कार्य केले तेच क्रांतीकार्य बौद्ध धर्माच्या उदयामुळे घडले आहे. अशातऱ्हेने बौद्ध धर्माचा उदय कोणत्या परिस्थितीत झाला हे समजावून घेतल्यास त्याचे महत्त्व कळेल. |

शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानामुळे आणि युक्तिवादामुळे बौद्ध धर्म निष्प्रभ ठरला असे अनेक लोक म्हणताना आढळतात. माझ्या मते ही गोष्ट चुकीची आहे. कारण शंकराचार्यांच्या निधनानंतर देखील अनेक वर्षे बौद्ध धर्म भारतात उत्कर्षाने वावरत होता. मला तर असे वाटते की, शंकराचार्य व त्यांचे गुरू हे दोघेही बौद्धधर्मीयच होते.

वैष्णव धर्म व शैव धर्म यांच्या भडक प्रचारामुळे बौद्ध धर्म हळू हळू नाहिसा झाला. बौद्ध धर्माचीच नक्कल या धर्मांनी केली होती. नकलेने बौद्ध धर्मास नाहीसा करण्याची ही क्लृप्ति और होती. यातच मुसलमानी स्वाऱ्याची भर पडली. अल्लाउद्दीन खिलजीने बिहारवर स्वारी केली तेव्हा त्याने