६-६-१९५० बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माला आव्हान - Page 253

२६९
बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माला आव्हान

सध्या अखिल मानव जातीपुढे 'नैतिक मूल्यांचा प्रश्न' हा अत्यंत निकडीचा झाला आहे, सांस्कृतिक संघर्ष, युद्धाची भाषा आणि धार्मिक ऱ्हास यांच्या विषमय वलयामध्ये अखिल मानव जात सापडली आहे. वैचारिक अराजकतेला तर सीमाच उरलेली नाही.

अशा अत्यंत, आणीबाणीच्या काळात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, बौद्ध धर्माचे विवेचन करताना कोलंबो येथे जी धर्मवाणी उच्चारली तिजपासून सर्व देशातील आणि विशेषतः भारतातील जनतेस खरा प्रकाश दिसेल आणि खऱ्या नैतिक मूल्याचे महत्त्वमापन केले जाईल असे मानण्यास हरकत नाही.

भारतातील बौद्ध धर्माचा उदय व अस्त या विषयावर कोलंबो येथील यंग मेन्स बुद्धिस्ट असोशिएनच्या विद्यार्थ्यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विचारप्रवर्तक व क्रांतिकारक असे दिनांक ६ जून १९५० रोजी भाषण झाले त्यावेळी ते म्हणाले,

भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असून तो जवळजवळ नष्ट झाला आहे असे म्हटले तरी मला ही गोष्ट मुळीच मान्य नाही. ऐहिक दृष्ट्या बौद्ध धर्माचा प्रसार वा चिन्हे भारतात दिसून येत नसतील आणि ती गोष्ट घटकाभर मी मान्यही करीन तथापि, आध्यात्मिक शक्ती म्हणून बौद्ध धर्म भारतात अद्यापिही ज्वलंत प्रभावाने अस्तित्वात आहे, ही गोष्ट कोणासही नाकबूल करता येणार नाही मात्र खेदाची गोष्ट अशी की, बौद्ध धर्माचा उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला. या प्रश्नाचा विचार अद्याप व्हावा तेवढा झालेला नाही. बौद्ध धर्माचे महत्त्व लक्षात घेता, सदर विषयाचा अभ्यास वास्तव दृष्टीने व खोलवर व्हावयास पाहिजे, अशा अभ्यासाचे महत्त्व भारतात आज तरी अधिक आहे, या विषयावर अधिकृतपणे माहिती देणारे ग्रंथ अगर इतर वाङ्मय उपलब्ध नाही हीही एक अडचणीची

गोष्ट आहे.

जनता : १० जून १९५०.