२७१
घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा
भारताचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मियांची परिषद आटोपून कोलंबोहून मुंबईस परत येत असता, ता. १० जून १९५० रोजी, त्यांचे त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेटिव्ह चेंबरमध्ये भाषण झाले. चेंबरच्या प्रशस्त हॉलमध्ये सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अस्पृश्य बांधव यांची खूपच गर्दी होती. घटना व घटनात्मक नीती यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समयोचित असे भाषण केले. ते म्हणांले,
प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्त्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे अवश्य आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे आहे :-
सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार
करण्याची सवय व बहुसंख्यांकांच्या नियमाचे पालन.
त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत :-
देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विशवास उडाला आहे, असे दिसून आल्यास घटनात्मक नीतीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे. अल्पसंख्यांकांबद्दल आदर बाळगला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्यशासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे.
आपल्या समाजातील निर॑निराळ्या लोकांची राहाणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्त्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसूत्रे खाली ठेवली पाहिजेत.
जनता : १७ जून १९५०.