एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही २८७
आपणाला माणुसकी मिळवून घ्यावयाची असेल तर आपला लढा आपण केला पाहिजे. म्हणून मी काँग्रेसचे राजकारण सोडून फेडरेशनचा लढा लढवीत आहे. (प्रचंड टाळ्या).
आजच्या राजकारणात कोणत्यातरी एका पक्षाबरोबर संधी केली पाहिजे. शंभरात अस्पृश्य नऊ किंवा दहा आहेत. असे असता तह करणे भाग आहे. खेळीमेळीचे राजकारण यशस्वी होऊ शकते. एकांगी राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. सोशॅलिस्टांच्या उमेदवारांना अशी खात्री वाटली पाहिजे की, आपले लोक या तडजोडीला मान्यता देऊन त्याप्रमाणे या निवडणुकीत वागतील. निश्चयाप्रमाणे वागणे यातच आमची इज्जत आहे.
मी पार्लमेन्टसाठी उभा आहे. ३० वर्षे राजकारण करीत आहे. राजकारण खुर्चीवर बसून सिगरेट पिण्याचे नाही. ते काही साधे काम नाही. माझे आता पुष्कळ झाले, पण समाजाची परिस्थिती मला गप्प बसू देत नाही. समाजाला चार पाऊले नेऊन पुढे सोडावे अशी माझी इच्छा आहे.
तरूण माणसे आता राजकारण लढवायला उतावीळ झाली आहेत! त्यांना राजकारणातला अनुभव हवा व तो आपल्यातील लोकात आहे की नाही याची शंका येते. आता त्यांची उमेदवारी जास्त दिवस नको! लवकरच त्यांना संधी मिळेल.
कोणत्याही राजकीय संस्थेला सहकारी असे एक दलही असले पाहिजे. जेव्हा अस्पृश्यांच्या याच विभागात सभा होत तेव्हा त्या भरविल्या न जाण्याची इतर लोक कोशिश करीत, दगडफेक करीत. सभातून गोंधळ उडवून दिला जात असे. त्यासाठी समता सैनिक दल उभारले गेले, पण पुढे या सैनिक दलात बिघाड झाला. विनयशीलपणा राहिला नाही. मी दिल्लीला गेल्यावर ही गोष्ट घडली. आज या दलाचे पुनरूज्जीवन होत आहे ही आनंदाची गोष्ट
आहे. त्यांनी आता दर एक चाळीत जाऊन एक मोठी कामगिरी बजावली
पाहिजे. आज एवढा अफाट समुदाय जमला आहे. वर्तमानपत्रवाले नक्की
किती आकडा सांगतील कोण जाणे ! केवळ अशा सभांना संख्येने हजर राहून
आपला कार्यभाग व्हायचा नाही तर प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला
पाहिजे. मुंबईत कार्याचा खरा दिवस ३ जानेवारी आहे.
अस्पृश्य समाजाप्रमाणे इतर मागासलेले समाज आहेत. त्यांच्या जीवनाकडे
आपुलकीने फेडरेशन पाहीलच. मजुरांच्या अडचणीप्रमाणे आमच्याही अडचणी
आहेत. पण केवळ जाती विरहित योजना आम्हाला आखता येत नाही. कारण
काही गोष्टी अशा आहेत की, त्या अस्पृश्यांच्या खास अडचणी आहेत व त्या
दलित फेडरेशनच सोडवू शकेल. यासाठी दलित फेडरेशनचे हात मजबूत ठेवा.