२२-११-१९५१ एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही - Page 326

२८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काही केले नाही, हे विधान काँग्रेस सरकारने अस्पृश्यांसाठी वरीलप्रमाणे

यांनी ते सारे खोटे दिल्लीच्या एका सभेत करताच होम मेंबर श्री. राजगोपालाचारी

आहे, असे पार्लमेंटमध्ये उत्तर दिले. पण त्यांचेच मन त्यांना खाऊ लागले व त्यांनी अस्पृश्यांच्या नोकरीच्या बाबतीत माहिती मिळविण्यासाठी एक सर्क्युलर काढले. त्यात त्यांना सगळीकडे शून्यच उत्तर आले असावे! काँग्रेस अस्पृश्यांचे काय भले करते व करू शकते त्याचा हा भला भक्कम पुरावा नाही काय ?

फाळणी झाल्यानंतर हिंदू-मुसलमानांचा प्रवाह चालला होता. तेव्हा पाकीस्तानने वरच्या वर्गाच्या हिंदुंना जाऊ दिले पण अस्पृश्यांवर कोंडवाड्यात गुरांना ठेवतात त्याप्रमाणे अत्याचार होऊ लागले. काँग्रेस सरकारने अस्पृश्यांना हिंदुस्तानात आणण्याचे बाबतीत काडीचीही मदत केली नाही. त्यावेळी महाराच्या पलटणी पाकिस्तानमध्ये होत्या. श्री. भाऊराव गायकवाड व श्री. रमेशचन्द्र जाधव यांना पाठवून या महार पलटणींच्या सहकार्याने एक एक अस्पृश्य स्त्री-पुरूषांना आम्ही हिंदुस्थानात जवळ जवळ ओढून आणले. या बाबतीत माझ्या मनामध्ये खंत उत्पन्न होते, एवढेच नव्हे तर काँग्रेसबद्दल घृणा उत्पन्न होते. ज्या अस्पृश्यांना येता आले नाही त्यांना मुसलमान व्हावे लागले. मला विचारावयाचे आहे की हा काँग्रेसच्या औदार्याचा पुरावा आहे काय ? पूर्व पंजाबमधून गेलेल्या निर्वासितांना हिन्दुस्थानात व शीख हिंदुंना निदान काही प्रमाणात जमिनी देण्यात आल्या, पण अस्पृश्य निर्वासितांना काय मिळाले ? फत्तर ? काही निर्वासितांनी राजघाटासमोर अन्न सत्याग्रह केला पण त्याला वर्तमानपत्रांनी किंवा काँग्रेसच्या लोकांनी महत्त्व दिले नाही. हे सारे वर्णन करण्यास महाभारताचे ग्रंथ होतील ।

काँग्रेसच्या लोकांना कबूल करावे लागले की, चार वर्षात मंत्री असताना मी बेइमानी केली नाही. आजारी असूनही माझ्या रक्ताचा बिंदू न बिंदू सरकारसाठी खर्च केला. (प्रचंड टाळया) त्यांच्या अंतस्थ यादवीत मी भाग घेतला नाही किंवा अढी बाळगूनही वागलो नाही. चार वर्षाच्या अनुभवाने मात्र मी विचार करू लागलो की, या पार्टीत राहून अगर मंत्री राहून एक साधा सवालही टाकता आला नाही. आता आपला स्वतंत्र मार्ग स्वीकारावा म्हणून मी राजीनामा दिला. (जय भीम ! टाळया).

इतक्या वर्षाच्या अनुभवाने एक विचार मात्र ठाम झाला व तो हा की, ज्याचा उद्धार त्यानीच करावा. लावीण पक्षीण आणि तिची पिले ही तुम्ही शाळेत वाचलेली गोष्ट इथे लागू पडते. ज्याला आपले शेत कापायचे असेल त्याने स्वतःच कापण्याचा निश्चय करावा आणि कामास लागावे. (प्रचंड टाळ्या.)