२९५
सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा
दि. १४ जुलै १९५२ रोजी मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये अस्पृश्य कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
भगिनींनो व बंधुंनो,
तुम्हाला मी आज निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलाविले आहे त्याचा हेतू हा आहे की, १९३८ साली मी मुंबईत इमारत फंड का स्थापन केला हे सर्वास माहीत आहे. या इमारत फंडाची आतापर्यंतची माहिती तुम्हास सांगावी व पुढे काय करावयाचे आहे ते ठरविण्यासाठी आजची सभा घेतली आहे. १९३८ साली इमारत फंड स्थापंन केल्यावर चाळीचाळीतून या फंडाचा प्रचार करण्यात आला व अस्पृश्य बांधवांकडून या फंडाला आज १४ वर्षे होऊन गेली तरी आपल्या इमारतीला मूर्त स्वरूप आले नाही. याला अनेक कारणे आहेत. मात्र मी स्वत: १९४२ पासून मुंबई सोडून दिल्लीला गेलो हे याला मुख्य कारण आहे. माझ्या गैरहजेरीत या फंडाचे काम जोमाने झाले नाही. मी असल्याशिवाय काहीही होत नाही ही स्थिती बरी नाही. परंतु तसे झाले ही गोष्ट खरी आहे. माझ्या गैरहजेरीत गेल्या दहा वर्षात लोकांच्या मनात अनेक संशय निर्माण झाले. इमारत फंडाचे काय झाले ? किंवा पुढे काय होणार ? याची कोणालाच कल्पना नाही. मी तुम्हाला आता काही आकडे सांगणार आहे. त्यावरून इमारत फंडाचे काम बंद नव्हते तर ते सुप्तावस्थेत चालू होते असे दिसून येईल. माझ्या मते आतापर्यंत या फंडात बरे पैसे जमले आहेत. इतके की, त्याची तुम्हाला स्वप्तातही कल्पना करता येणार नाही.
आज हा इमारत फंड १,११,२२८ रु. ४ आणे ३ पैसे इतका झाला आहे. अस्पृश्य समाजाच्या इतिहासात इतकी मोठी रक्कम जमल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. एक लक्ष अकरा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये चार आणे, तीन पैसे या रकमेत आपल्या लोकांची रक्कम फक्त ३१,७०९ रु. ४ आणे (एकतीस हजार सातशे नऊ रुपये चार आणे) एवढीच आहे. बाकीची ७५,५०० रुपये (पंचाहत्तर हजार घाचशे रुपये) रक्कम मी वरच्या वर्गाच्या माझ्या मित्रांकडून
जनता : १९ जुलै १९५२.