भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे ३४७
ह्या आमच्या पंतप्रधानांना दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न डोळ्यासमोर दिसतो. भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न वर्णभेदाचा आहे. त्यांच्याकरिता तेथील ब्रिटिश लोक हिरीरीने भाग घेत आहेत पण हे आमच्या प्रश्नाला मात्र कलाटणी देण्यास तयार होतात. तेव्हा ह्या पंतप्रधानांना शहाणा म्हणावे की वेडा म्हणावे हा आमच्यापुढे प्रश्न आहे. पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांनी मुसलमानांवर स्वारी केली. त्यात सिदनाक महार सरदार होता. त्याचा तंबू पेशव्यांच्या जवळ असे. त्याचा तंबू ठोकीत असताना पेशव्यांच्या लोकानी अडथळा केला. बातमी त्यांना कळली. त्यावेळेस दरबार भरला होता. सिदनाक महाराने आपली तलवार खाली ठेवली व जाण्यास निघाला. तेव्हा हंबीरराव मोहिते ताडकन उठला आणि म्हणाला, ही लग्नाची पंगत नाही, वीरांची पंगत आहे. येथे कोणताच भेदभाव नाही. यामुळे आम्हाला राजकारणात वरचा वाटा पाहिजे. मी जर आजपर्यंत काँग्रेसमध्ये असतो तर नेहरू पंतप्रधान झाला असता काय ? मुळीच नाही. मी झालो असतो.
आमच्या फेडरेशनमध्ये बरेच बाजारबुणगे जमा झाले आहेत. ज्यांना फेडरेशन सोडावयाची असेल त्यांनी आताच तिथून चालते व्हावे. त्यांना तीत जागा नाही. दोन दगडावर पाय ठेवू नये, फेडरशेनचे झाड लवकर फळ देणार नाही. त्याला फळे उशिरा येणार आहेत, पण ती चिरकाल टिकणारी आहेत. जे झाड लवकर येते व फळ लवकर लागतात ते झाड लवकर लयास जाते. असले झाड आमच्या उपयोगाचे नाही. तेव्हा ज्यांना लवकर फळ
पाहिजेत त्यांनी तिकडे जावे.
आमच्या लोकांनी आजपर्यंत हालअपेष्टा सहन केल्या, त्यांच्याकरिता मला काहीतरी करावयाचे आहे. त्यांना मला वाऱ्यावर सोडून द्यावयाचे नाही. आमच्या कार्यकर्त्यांना आरामखुर्चीचे राजकारण करावयाचे नाही. पुढे पुढे लोखंडाचे चणे खावे लागतील. तेव्हा ज्यांना हे पचणार नाही त्यांनी निमूट निघून जावे. मला फेडरेशनमध्ये थोडे लोक असलेले चालतील. ज्यावेळेस मी चळवळ सुरू केली त्यावेळेस मी, अध्यक्ष आणि टेबल एवढेच होतो ! त्याच्यावरून मी हताश झालो नाही. जरी ह्या निवडणुकीमध्ये आपला पराजय झाला, तरी आपण निराश होता कामा नये. आपली चळवळ जिवंत ठेवा. वेळ आल्यास मी तुम्हाला हाक मारीन आणि तुम्ही हाकेला ओ [द्या. ]