आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३४६
काँग्रेसमध्ये त्याचप्रमाणे आमच्यातले चांभार बंधु आपला फायदा करण्याकरिता
राखीव जागा मुंबई राज्याकरिता शिरले. स्वराज्यामध्ये आपल्याला एकंदर २७
मिळालेल्या आहेत. त्यात २५ काँग्रेसी चांभार निवडून आले. त्यांनी आतापर्यंत एक प्रश्नसुद्धा अस्पृश्यांविषयी लोकसभेमध्ये किंवा असेंब्लीमध्ये
विचारला नाही.
एका सिंहीणीला दोन पिल्ले झाली. त्यांना सोडून ती सिहीण रानात भटकण्याकरिता गेली. तिला जवळ दोन कोल्ह्यांची पिल्ले दिसली. तिने ती पिल्ले उचलून आपल्या पिल्लात आणली. त्या पिल्लांना ती आपल्या पिल्लाबरोबर दूध पाजीत असे. ती सर्व पिल्ले मोठी झाल्यावर एकदा कडेला उभी होती. तिकडून एक हत्ती मान डोलवीत चालला होता. तो जवळ येताच कोल्ह्याची पिल्ले घाबरून. पळून गेली. तेव्हा सिंहीणीच्या पिल्लांना संशय आला. त्यांनी हा प्रश्न आईला विचारला. संशयास बाध येऊ नये म्हणून त्या कोल्हयाच्या पिल्लांना तिने नेऊन सोडून दिले.
ही गोष्ट सांगण्याचा मतलब एवढाच की, आपण गेल्या निवडणुकीत पराभूत झालो नाही. आपल्या लोकांनी स्वतः पायी येऊन मतदान केले. मी असे आव्हान देतो की, ज्यांना असे वाटते की आमच्या लोकांनी आम्हाला मते दिली नाहीत त्यांनी हे खरे करून दिले आणि ते खरे ठरले तर मी राजकारणातून बाहेर
निघून जाईन.
आता आपण एकटे राहिलो. आपण अल्पसंख्यांक लोक आहोत. आपण
ताकदीप्रमाणे पराक्रम करीत आलोत. दुसऱ्याशी हात मिळवणी झाली तर आपण राज्य मिळवू. पण निराश होण्याचे कारण नाही. आजचे काँग्रेस सरकार, ब्राह्मण व मराठे एक तोबरा, दोन माना ह्याप्रमाणे चालले आहे. पण चणा कोण खातो हे पाहावयाचे आहे. मराठ्यांचा घोडा नवीन आहे. दुसऱ्या वेळेस मराठे सर्वच चणे खातील. पुढे ब्राह्मणांना काहीच उरणार नाही व ते परत आपणाकडे फिरतील. मराठ्यांना नळी मिळाली, आमचा ' घुडसा ' आहेच ; ही काही आपुलकीची भावना नाही. हयाच्यामुळे पेशवाई येईल. आमचे सरकार घटनेप्रमाणे दिलेल्या सवलती काढून घेणार आहे. पं. नेहरूने नागपूरच्या ' हरिजन ' परिषदेमध्ये भाषण केले. त्यात अस्पृश्यांना आता सवलतीची काही गरज नाही, त्यांची सुधारणा झाली आहे, असे म्हटले. मला
वाटते ह्या नेहरूला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासारखे आहे. ज्यांना आपल्या देशातील लोकांची परिस्थिती माहीत नाही त्याला पंतप्रधान निवडावे हे देशाचे दुर्देव होय. याप्रमाणे आपल्याला मिळालेल्या सवलती काढून घेण्यात येत आहेत.