१४-१-१९४६ जे लोक कोट्यवधींना अस्पृश्य नि गुन्हेगार मानतात त्यांना स्वातंत्र्य मागण्याचा हक्क कसा पोहोचतो ? - Page 39

२३३

जे लोक कोट्यवधीना अस्पृश्य नि गुन्हेगार मानतात

त्यांना स्वातंत्र्य मागण्याचा हक्क कसा पोहोचतो ?

अस्पृश्यांचे एकमेव पुढारी व हिंदुस्थान सरकारच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ता. १४ जानेवारी १९४६ रोजी सोलापूर येथे सकाळच्या मद्रास मेलने आले.

सकाळी सोलापूर नगरपालिका व जिल्हा लोकल बोर्ड या संस्थेच्या वतीने हरिभाई देवकरण हायस्कूलचे कै. रा. ब, मुळे स्मारक मंदिरात डॉ. साहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रमुख व्यापारी, डॉक्टर्स, सरकारी अधिकारी, वकील इत्यादी निमंत्रित मंडळी उपस्थित होती,

सुरुवातीस नगरपालिकेतर्फै देण्यात येणारे मानपत्र नगराध्यक्ष रा. ब. नागप्पा अण्णा अफजूलपूरकर यांनी वाचून दाखवून ते डॉ. बाबासाहेबांना अर्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा बोर्डाचे मानपत्र बोर्डाध्यक्ष श्री. जी. डी. साठे यांनी वाचून अर्पण केले. मानपत्रांना उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

मला मानपत्रे अर्पण केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. सोलापूर शहरास मी अपरिचित नाही व येथे मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. राजकारण व समाजकारण यांचा प्रचारही केलेला आहे. खरे पाहिले तर सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापूरातच मी रोवली, कै. डॉ. रा. ब. मुळे यांनी अस्पृश्यांसाठी बोर्डिंग उघडले व त्यांचेच कार्य त्यांचे बंधु डॉ. भालचंद्रराव ऊर्फ काकासाहेब मुळे यांनी उत्तमप्रकारे चालविले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

हिंदुस्थान सरकारचा आतापर्यंतचा इतिहास अवलोकन केला तर कर वसूल करणे व कायदा व सुव्यवस्था पाहणे ही दोनच ध्येये त्यांच्यापुढे होती. पण अलीकडे त्यात बदल झाला आहे. देशातील दारिद्र्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते दारिक्र्य नाहीसे करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे, हे कोणीही कबूल करील. दिल्लीत आज पुनर्घटनेचे कार्य जोरात सुरू आहे. राहण्याची सोय, शिक्षण, उद्योगधंदे यांचे बाबतीत मध्यवर्ती सरकारची ९० टक्के शक्ती खर्च होत आहे. लोकल बोर्ड, म्युनिसिपालिट्या यांना मदत देऊन या गोष्टी अमलात आणण्याची सक्ती करण्याचे धोरण आखले जाणार आहे.

जनता : १९ जानेवारी १९४६.