१-७-१९५४ समाजाची दिशाभूल करणाऱया पुढाऱ्यांवर कडक नजर ठेवली पाहिजे - Page 432

३२२
समाजाची दिशाभूल करणार्‍या पुढाऱ्यांवर
कडक नजर ठेवली पाहिजे

मुंबईतील कामा हॉलमध्ये दि. १ जुलै १९५४ रोजी मुंबई प्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या वार्ड कमिट्यांच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिले ते म्हणाले |

बंधु आणि भगिनींनो

तसे पाहिल्यास मला या ठिकाणी काही स्थान आहे असे वाटत नाही. कारण मी कोणता एखादा वार्ड मेंबर म्हणून येथे आलो नाही, तर पुढे होणाऱ्या हीरक महोत्सवासाठी तुम्ही किती पैसा गोळा केला आहे व करणार आहात हे पाहावयासाठी मी येथे आलो. बऱ्याच शेड्यूल्ड कॉस्ट्स्‌ फेडरेशन शाखेच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत पैसा जमविला, पावत्या पुस्तके नेऊन पैसा उकळला परंतु योग्य त्या अधिकाऱ्याकडे मात्र तो पोहोचता केलेला नाही असे मला आढळून आले आहे. कुणाकडे किती पैसे आहेत व त्याची काय विल्हेवाट लावली आहे याचा हिशोब नाही. तेव्हा त्या गोष्टीची अगोदर चौकशी व्हावी असे मला वाटते.

आज पर्वताला देखील मुंग्या भोके पाडू लागल्या आहेत व आता पुढेही पाडीत

राहातील याची तुम्हाला फारशी जाणीव नाही. तेव्हा आज तुमची ही स्थिती आहे, पुढे काय होणार ? तुमचा भावी काळ काय आहे ? तुमचे भवितव्य काय आहे ? ह्याची अजून कल्पना नाही. तुमच्या पुढील काळाची जरी कल्पना असली तरी आज मी तुम्हाला त्याबद्दल काही बोलत नाही. असा एखादा दिवस येईल की, ज्या दिवशी मी तुम्हा साऱ्यांना एकत्र जमा करून पुढे काय होणार आहे व त्याकरिता काय करावयास पाहिजे, हे सर्व-काही सांगेन. ' निदान आजतरी या बाबतीत मी काही बोलू इच्छीत नाही. परंतु तुमच्या भविष्यकाळाकडे नीट नजर द्या.

आपल्या सार्वजनिक कार्यासाठी अशा एखाद्या हॉलची जरूर आहे की ज्याच्या भाड्यावर आपला थोडाफार सार्वजनिक खर्च भागेल. त्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही ८७ हजार जमा केले पण मी एक लाखाच्यावर जमा केले आहेत. अद्याप आपल्याला २५ हजारांची आवश्यकता आहे. त्याकरिता तुम्ही ठिकठिकाणी चाळ कमिट्या स्थापन करा. ज्यांच्याकडे पावत्या पुस्तके

जनता : ३ जुलै १९५४.