१८-३-१९५६ माकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्व आहे - Page 504

३३८

भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे

आग्रा येथे रविवार दिनांक १८ मार्च १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेश शे. का. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. तिलकचन्द कुरील हे होते. व्यासपीठावर पंडित श्रीकृष्णदत्त पालीवाल आणि उत्तर प्रदेशातील अनेक नामांकित सार्वजनिक कार्यकर्ते व पुढारी उपस्थित होते. सभेला दोन लाखाचा जनसमूह उपस्थित होता.

ज्या ठिकाणी त्यांचे भाषण झाले त्या रामलीला मैदानावर डॉ. बाबासाहेबांचे साडेसहा वाजता आगमन झाले.

रामलीला मैदानावर त्यांनी प्रवेश करताच 'आंबेडकर की जय हो' अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. त्यांच्या भाषणासाठी आग्रा शहरातीलच नव्हे तर आसपासच्या अनेक शहरे व खेडी यातून हजारोंच्या संख्येने अस्पृश्य समाज आला होता. मोटारीतून उतरल्यानंतर त्यांना दुसऱ्याचा आधार घेऊन काठी टेकवित व्यासपीठाकडे जावे लागले परंतु भाषण देताना फक्त एका स्टूलच्या आधाराने ते ताठ उभे होते. याप्रसंगी त्यांना एक पाच हजार रुपयांची व दुसरी एक हजार रुपयांची थैली देण्यात आली. ते आपल्या भाषणात म्हणाले,

२५ वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात तीन उद्देश होते. प्रथम उद्देश होता : अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे. हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य प्रगती करू शकतील, हा मला आत्मविश्‍वास आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधीत्व मिळवून देणे हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता. माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हा सर्वांना दिसतच आहे. मला या दोन्ही उद्देशात सफलता प्राप्त झाली आहे. परंतु खेड्यापाड्यातून राहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे.

प्रबुद्ध भारत : २४ मार्च १९५६.