१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 554

५१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माचा स्वीकार यासंबंधी उद्बोधक, स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीचे, माहितीपूर्ण भाषण दीक्षामंडपात झाले. लाखो लोक, ते भाषण उन्हात उभे राहून व जागा मिळेल तसे बसून एकाग्रतेने ऐकत होते. '**

ते आपल्या भाषणात म्हणाले,

' सर्व बौद्धजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी,

काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता. आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरूरी काय व त्याने काय होईल, याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते. परंतु काही गोष्टी अशा अनिश्‍चित असतात की त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे, तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडले नाही.

पुष्कळसे लोक मला असा प्रश्‍न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर . हेच शहर का ठरविले ? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही ? काही लोक असे म्हणतात की आर. एस. एस. ची-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची-मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी मजजवळ

वेळ नाही.

हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रु होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग

१. डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : ले. चां. भ. खैरमोडे, खंड १२, पृ. ५७.