२०-५-१९५६ भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय ? - Page 620

५८० डॉ. बाबासाहे ब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अवस्थेच्या तुलनेत शिक्षण प्राप्त केल्यानंतर जातिव्यवस्था टिकून राहावी असे प्रकर्षाने वाटत असते. कारण हेच शिक्षण त्याला मोठे पद उपलब्ध होण्याची अधिकची संधी देत असल्यामुळे जातिव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो अधिक रुची घ्यायला लागतो. या दृष्टीने पाहता जातिव्यवस्था समाप्त करण्यासाठी शिक्षण उपयुक्त साधन ठरत नाही. ही झाली शिक्षणाची नकारात्मक बाजू. भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिले तर हे शिक्षण जातिव्यवस्थेला विरघळून टाकेल. ते त्यांच्यात बंडखोरीची प्रवृत्ती निर्माण करील. त्यांच्या सद्यःपरिस्थितीतील अज्ञानामुळे, ते जातिव्यवस्थेचे समर्थक बनलेले आहेत. एकदा त्यांचे डोळे उघडले तर ते जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी उद्युक्त होतील.

वर्तमान धोरणातील प्रमुख दोष असा की, शिक्षण हे मोठ्या प्रमाणावर दिले जात असले तरी भारतीय समाजाच्या वाजवी वर्गातील लोकांना दिले जात नाही. भारतीय समाजातील ज्या लोकांचा जातिव्यवस्थेत निहित स्वार्थ दडलेला आहे आणि जिच्यामुळे त्यांना फायदा होतो त्याच स्तरातील लोकांना जर तुम्ही शिक्षण दिले तर जातिव्यवस्था अधिक मजबूत होईल. असे न करता भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील जे लोक जातिव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छितात त्यांना जर शिक्षण दिले तर जातिव्यवस्था निश्‍चितच उद्ध्वस्त होईल. प्रत्येक वेळी कोणतेही तारतम्य न पाळण्याचे भारत सरकार आणि अमेरिकन फाउंडेशनचे शिक्षणाला मदत करण्याचे धोरण, जातिव्यवस्था मजबूत करीत आहे. श्रीमंताला अधिक श्रीमंत आणि गरिबाला अधिक गरीब करणे हा काही दारिद्र्य नष्ट करण्याचा मार्ग नाही. जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी शिक्षणाचा साधन म्हणून उपयोग करण्याच्या धोरणाला ही गोष्ट लागू होते. जातिव्यवस्था कायम ठेवू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देण्यामुळे भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल होणार तर नाहीच, उलट हे धोरण भारतीय लोकशाहीला मोठ्या संकटात टाकेल. |

२६, अलिपूर रोड, (सही) बी. आर. आंबेडकर, नवी विल्ली,

तारीख, २० मे १९५६.

२० मे १९५६ ला “व्हॉइस ऑफ अमेरिका? या नभोवाणी केंद्रावरून केलेल्या भाषणाचा अनुवाद.

अनुवादक : संपादक मंडळ.