डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५७९
जातिव्यवस्था कशी संपविता येईल ? पहिला अडथळा म्हणजे जातिव्यवस्थेचा प्राण असलेली श्रेणीबद्ध विषमता होय. जेव्हा लोक उच्च आणि निम्न अशा दोनच वर्गात विभागलेले असतात तेव्हा वरच्या वर्गाशी संघर्ष करण्याच्या उद्देशाने निम्न वर्गाला संघटित होणे सोपे जाते. परंतु येथे निम्न जातीचा एकच वर्ग नाही. हा वर्ग निम्न आणि अतिनिम्नांचा असतो. निम्न हे अतिनिम्नांसोबत संघटित होऊ शकत नाही. निम्नांना अशी भीती वाटत असते की, जर तो अतिनिम्नांचा स्तर उंचविण्यात यशस्वी झाला तर त्याला आणि त्याच्या जातीला समाजात असलेले वरचे स्थान गमवावे लागेल.
दुसरा अडथळा असा की आपले समाजहित कशात आहे हे ओळखता न आल्यामुळे एकत्रितपणे कृती करण्याच्या प्रसंगी भारतीय समाज पंगू ठरतो. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सामाजिक संघटन अंतिमत: जीवित साध्याच्या जाणिवेवर अवलंबून असते. जर आपण आपल्या साध्याबद्दल अनभिज्ञ असू, आपले हित कशात आहे हे जर आपणास माहीत नसेल तर सर्व बाबीसाठी आकस्मिकता आणि लहरीपणा यांच्या कृपेवर अवलंबून राहावे लागेल. जोपर्यंत आपल्याजवळ सुपरिणामाबाबत बुद्धिवादी निर्णयाचे निकष नसतील, तोपर्यंत कोणत्या शक्यतांना आपण चालना द्यावी हे आपल्याला ठरविता येणार नाही. प्रश्न असा आहे की, न्याय्य आणि एकजिनसी समाज निर्माण करण्याच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गातील जातिबद्ध रचनेचा अनुल्लंघनीय अडथळा दूर केल्याशिवाय भारतीय समाज हे ध्येय साध्य करू शकेल काय ? जातिबद्ध समाज रचना अस्तित्वात असताना एकजिनसी समाज निर्माण होणे शक्य आहे काय? चुकीचे मूल्यमापन आणि चुकीचे वास्तवदर्शन यामुळे सर्व भारतीयांच्या मनात गोंधळ उडालेला आहे आणि त्यांना चुकीच्या दिशेने नेले आहे. असंघटित आणि खंडित समाज विविध प्रकारची प्रारूपे आणि प्रमाण निर्धारित करतो. अशा परिस्थितीत जातीच्या प्रश्नामुळे प्रत्येक भारतीयाला मनाची सुसंगतता प्राप्त करणे अशक्यप्राय झाले आहे.
शिक्षणामुळे जातींचा विध्वंस होऊ शकतो काय ? याचे उत्तर “होय” त्याचप्रमाणे ` “नाही? असे आहे. आज जे शिक्षण दिले जाते तेच जर दिले जाणार असेल तर त्या शिक्षणाचा जातीवर काहीच परिणाम होणार नाही. ती ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात राहील. ब्राह्मण जात याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिच्यातील शतप्रतिशत शिकलेले आहेत, नव्हे तिच्यातील बहुसंख्य उच्चशिक्षित आहेत, असे असताही एकही ब्राह्मण जातिविरुद्ध असल्याचे दिसत नाही. वास्तविकता अशी आहे की वरच्या जातीतील शिक्षण घेतलेल्या माणसास शिक्षण घेण्यापूर्वीच्या