डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्रीय योगदान हे असे क्रांतिकारी स्वरुपाचे आहे. या एकोणिसाव्या खंडामध्ये बाबासाहेबांची वृत्तपत्रीय विचारक्रांती सामग्ग्राने ग्रथित करण्यात आली आहे. या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अग्रलेख, स्फुटलेख, संदेश, लेख इत्यादी अंतर्भूत करताना त्यांनी लेखांस जी शीर्षके दिली होती, ती तशीच कायम ठेवण्यात आली आहेत. ज्या लेखांना विशेषत: स्फुटलेखांना त्यांनी शीर्षके दिली नव्हती, त्यांना संपादक मंडळाने त्यातील आशयानुरुप शीर्षके दिली आहेत. ही शीर्षके लक्षात येण्यासाठी ती इटालिकमध्ये नमूद केली आहेत. तत्कालीन महत्त्वपूर्ण घटना प्रसंगांवर भाष्य करणारी परिशिष्टे येथे विशेषत्वाने जोडलेली आहेत. बाबासाहेबांनी विचाराविष्कार करताना देश-विदेशातील अनेक विद्वान लेखकांच्या संशोधकांच्या विचार-कार्याचा उल्लेख केला आहे. तसेच विविध ऐतिहासिक, समाजशास्त्रीय तत्त्वसरणींचा, तत्त्वज्ञांच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्या लेखनात परामर्श घेतला आहे. त्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्याची विषयाच्या दृष्टीने माहिती होणे अगत्याचे असल्यामुळे त्यांच्या विषयीची आवश्यक ती माहिती व्यक्ती, संस्था कार्यसूची या विभागात दिलेली आहे. याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या लेखनात काही महत्त्वपूर्ण घटना लक्षात घेऊन विचार प्रदर्शित केले आहेत व त्या घटनांची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आहे. डॉ. आंबेडकरांनी काही लेखन स्वत: केले असले तरी प्रसंगानुरुप त्यांनी आपले नाव तृतीय वचनी लिहिले आहे. ही सर्व माहिती परिशिष्टात अंतर्भूत केली आहे.
-संपादक-
(बत्तीस)