MR/Khand_19 - Page 39

फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत बहिष्कृत भारताचे बऱ्या वाईट रीतीने रकाने भरुन काढून लोकजागृतीचे काम केले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषआरामाकडे न पाहता डोळ्याच्या वाती केल्या...... प्रस्तुतच्या लेखकाने जो स्वार्थत्याग केला आहे त्यात त्याने विशेष काही केले आहे असे नाही व प्रस्तुतचा लेखक तसे म्हणतही नाही.'' बाबासाहेबांचे हे आत्मनिवेदन अत्यंत व्याकुळ व करुणगंभीर स्वरुपाचे आहे. त्यांचे अंतर्मन येथे उत्युत्कटपणे अंतरीच्या उमाळ्यातून अभिव्यक्त होते.

वृत्तपत्राच्या माध्यमातून आकारास आलेला बाबासाहेब आंबेडकरांचा निबंध मराठी समाजजीवनामध्ये अत्यंत मोलाचा ठरतो. त्यांचा निबंध हा वैचारिक निबंध आहे. या निबंधाने महाराष्ट्रीय समाजजीवनाबरोबर भारतीय समाजजीवन देखील तळा-मुळापासून हलवून सोडले. भारतीय समाज विचारास त्यांनी विधायक दिशा बहाल केली. बाबासाहेबांचे समाजचिंतन हे मुळात मानवमुक्तीचे चिंतन आहे. त्यांचे समाजचिंतन हे स्थलकालाच्या तसेच देशप्रांताच्या सीमारेषा ओलांडून पुढे जाते व संपूर्ण वैश्विक जीवनाशयाला कवेत घेते. बाबासाहेबांचे समाजचिंतन विश्वोत्तीर्ण व कालोत्तीर्ण स्वरुपाचे आहे. त्यांचे सामाजिक चिंतन धर्म, अर्थ, राजकारण या सर्व घटकांचे सहसंबंध विश्लेषित करणारे आहे. हिंदूंची धर्मशास्त्रे व समाजशास्त्रे धर्ममार्तडांच्या दृष्टिकोनातून एक असल्याचे ते प्रतिपादन करतात. बाबासाहेबांच्या मते, सामाजिक प्रश्‍नांचा विचार धर्मशास्त्राच्या अनुज्ञेप्रमाणे न करता तो समाजशास्त्राच्या सिद्धांताच्या आधारे करण्यात यावा. त्यामुळेच ते धर्मशास्त्राचे क्षेत्र व धर्मज्ञाचे अधिकार निश्चित करण्याची आवश्यकता विश्लेषित करतात. धर्मासाठी माणूस नसून माणसासाठी धर्म आहे, ही धर्माकडे पाहण्याची त्यांची स्वच्छ भूमिका आहे. त्यांची ही धर्मातीत व ईश्वरातीत भूमिका मानवाच्या लौकिक जीवनास अधिकाधिक समृद्ध करताना दिसते. मुक्त व आदर्श नागरिकत्वाच्या बाबासाहेबांच्या कल्पना अगदी सुस्पष्ट स्वरुपाच्या आहेत. ते लिहितात, ““ कोणत्याही व्यक्तीस नागरिक म्हणविण्यास काही हक्‍क असावे लागतात. त्यात (१) वैयक्तिक स्वातंत्र्य, (२) वैयक्तिक संरक्षण, (३) खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क, (४) कायद्याच्या बाबतीत समता, (५) सद्सदविवेक बुद्धीला अनुसरुन वागण्याची मोकळीक, (६) भाषणस्वातंत्र्य व मतस्वातंत्र्य, (७) सभा भरविण्याचा हक्क, (८) देशाच्या राज्यकारभारात प्रतिनिधी पाठविण्याचा हकक आणि (९) सरकारी नोकरी मिळविण्याचा हक्क, यांचा अंतर्भाव होतो.'' याच समाताधिष्ठित हक्कांचा पुरस्कार बाबासाहेब नंतरच्या काळात भारतीय संविधानामध्ये करताना दिसतात. त्यांचा वैचारिक निबंध हा या प्रकारे धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणारा आहे.

(एकतीस)