अस्पृश्यता आणि तिचे बीभत्स स्वरूप - Page 447

परिशिष्ट-१
अस्पृश्यता आणि तिचे बीभत्स स्वरूप

“१९२० च्या नंतर सवर्ण हिंदूंमध्ये अस्पृश्यांच्या दुःसह परिस्थितीबद्दल जाणीव झाली. त्यातील काही लोक अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करू द्यावा असे मत प्रतिपादन करू लागले. हिंदूंच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, की त्यांची अस्पृश्यता नष्ट होईल व त्यांना व्यावहारिक जीवनांत इतर हिंदुंबरोबर आपली प्रगती घडवून आणण्यास संधी मिळेल, या कल्पनेचे बीजारोपण प्रथम दक्षिण हिंदुस्थानांत झाले. कारण तेथील अस्पृश्यांना नुसते अस्पृश्यच समजत नसत, तर त्यातील काही जातींना अस्पृश्य म्हणजे ज्याचे दर्शन हिंदूंना झाले तर विटाळ होईल, अशा कल्पना रूढ होत्या. मलबारांत माथडी, तीट्या, चैरूमान इत्यादी अस्पृश्य जाती आहेत. त्यांना सवर्ण हिंदूंपासून काही अंतरावर उभे राहून सवर्ण हिंदूंना होणारा विटाळ टाळावा लागतो. या लोकांनी एकमेकांमध्ये २४ ते ७४ फूट अंतर ठेवावयाचे असते.

दक्षिणेत हिंदूंचे राज्य असताना ठराविक अंतर सोडून जर एखादा अस्पृश्य

जवळ आला तर नायर जातीचा शिपाई त्याचा तेथेच शिरच्छेद करीत असे व

त्याबद्दल त्याला 'तू धर्माचे रक्षण केलेस म्हणून तू स्वर्गास जाशील' असा ब्राह्मणाकडून आशीर्वाद मिळे. ब्राह्मणांसाठी स्वतंत्र रस्ते राखून ठेवलेले असत. त्यांना अग्रहार म्हणत. या रस्त्यांतून ब्राह्मणशिवाय कोणी चालू लागला की त्याला देहांताची शिक्षा होत असे व नंतर अग्रहाराची (रस्त्याची) शास्त्रोक्त शुद्धी करण्यात येत असे. तिय्या जातीचे लोक विश्वविद्यालयाचे पदवीधर झाले तरी त्यांना रूढीपरंपरेप्रमाणे वागावे लागे. त्यामुळे अस्पृश्यांना व विशेषत: सुशिक्षितांना हिंदूंचा व हिंदू धर्माचा मनस्वी तिटकारा उत्पन्न झाला. त्यातील काही लोकांनी खिस्ती व काहींनी मुसलमान धर्म स्वीकारला आणि मग ते सवर्ण हिंदूंबरोबर समतेने वागू लागले.

(South Indian Social Mysteries, by V. R. Shinde, B. A, The Servant of India, dated 24-4-1919).