अस्पृश्यता आणि तिचे बीभत्स स्वरूप - Page 448

४०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदूलोक अस्पृश्यांना जिवंतपणी अस्पृश्य समजतात तसेच ते त्यांना मेल्यानंतरही अस्पृश्य समजतात. या बद्दलचे एका अस्पृश्याने ज्ञानप्रकाशच्या दि. १२-१०-१९२३ च्या अंकात तक्रारपत्र प्रसिद्ध केलेले होते, ते असे :--

महारांच्या प्रेतास ब्राह्मणेतरांच्या स्मशानात मनाई !

बार्शी येथे एक महार मनुष्य मेला असता त्याचे प्रेत काही महारांनी अंत्यसंस्कारासाठी तेथील मराठ्यांच्या स्मशानात नेले. पण त्यास ब्राह्मणेतरांनी हरकत केली. अखेर हा तंटा अधिकाऱ्यापर्यंत गेला व महारास पूर्ववहिवाटीप्रमाणे त्यांच्याच स्मशानभूमीत प्रेत जाळावे लागले, अशी हकीकत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही हकीकत वाचल्यावर कोणासही विषाद वाटल्यावाचून राहणार नाही. प्रेतास मूठमाती देणे ही गोष्ट अगदी क्षुल्लक आहे व वहिवाटीप्रमाणे ती ज्या त्या जातीच्या ठराविक स्मशानभूमीतच झाल्यास काय वाईट, स्मशानात समतेचा हक्क मागण्याने स्वराज्य मिळणार आहे काय, असेही प्रश्‍न कोणी वावदूक लोक विचारण्यास चुकणार नाहीत. परंतु जरा बारकाईने विचार केला असता, आपल्या समाजातील फाटाफूट व धर्मवेडेपणाची कल्पना कोठवर भिनली आहे हे पाहून विषाद वाटतो. महाराला समाजात जिवंतपणी नागरीकत्वाचा हकक नाहीच, परंतु पंचतत्त्वास गेलेल्या त्याच्या शरीराला मूठमाती देण्याच्या वेळीही जर कोणी रूढीची मर्यादा रेसभर ओलांडू म्हणेल, तर मेल्यानंतरही अपमानाचे मरण त्यास सोसावे लागते. आज कोणत्याही स्मशानभूमीत-मग ती ब्राह्मणांची असो वा ब्राह्मणेतरांची असो- तेथे रात्रंदिवस राहून व्यवस्था ठेवण्यास महार मनुष्य चालतो, किंबहुना त्यालाच बहुतेक ठिकाणी हे वतन दिलेले असते. तथापि तो स्वतः मेल्यास त्याच्या प्रेताचा विटाळ या दहनभूमीस खपत नाही, हे कोठले तर्कशास्त्र ? आपण सर्व एकाच देशाचे पुत्र आहोत व बंधू आहोत असे म्हणून फायद्यापुरते कुरवाळणारे लोक मयताची विल्हेवाट लावण्यासारख्या अंत्यसंस्काराच्या वेळीही आपल्या मनातील दुजाभाव तिळभरही कमी करणार नाहीत, तर मग एकीचे एवढे मोठे ढोंग कशाला ? ' आत्मवत्‌ सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति ' हे सांगणाऱ्या भगवद्गीतेचे तरी स्तोम Vas माजवावयाचे कशाला ? बार्शीमध्ये घडल्यासारखे प्रकार ठिकठिकाणी मुद्दाम घडवून आणावेत असे आम्ही सुचवीत नाही. झालेल्या प्रकाराच्या मुळाशी ज्या भावना आहेत त्या समूळ नष्ट होण्यावरच हिंदुस्थानची ऊर्जितावस्था अवलंबून आहे असे मानण्यास बिलकुल प्रत्यवाय नाही. * *

७७७

१ : खैरमोडे, खंड २ रा, पृ. ३८, ४७-४८.