न कळत आलेला अस्पृश्य देऊळ भ्रष्ट करीत नाही - Page 489

परिशिष्ट-१८
न कळत आलेला अस्पृश्य देऊळ भ्रष्ट करीत नाही

श्रीयुत बहिष्कृत भारत कर्ते यांस :-खालील चार ओळी आपल्या पत्रांत छापण्याची कृपा व्हावी,

मी शनिवार ता. ९ जुलै १९२७ रोजीं संध्याकाळीं vil वाजतां फणसवाडींतील नव्या बांधलेल्या प्रतिवादी भयंकर मठाच्या देवळांत गेलों होतों. सर्व देऊळ फिरून देवदर्शन झाल्यावर मी तेथील पुजाऱ्यास विचारिलें की, येथे कांही दिवसापूर्वी डॉ. आंबेडकर साहेब आले होते काय ? तर तो म्हणाला कीं ओ कौन डॉ. आंबेडकर है ए हम नहीं जानता. लेकीन तुम कौन है ? तुमारी जात क्या? तेव्हां मी त्यास सांगितलें कीं, मी जातींने महार आहें. असें मी सांगितल्यावर त्या पुजाऱ्यानें मला तेथल्या पहारेकऱ्याच्या स्वाधीन केलें. त्या पहारेकऱ्यानें मला दमदाटी देण्यास सुरवात केली व पोलीसला बोलावण्यास दुसरा मनुष्य पाठविला. १॥ किंवा २ तासांनीं ४१३ नंबरचा पोलीस शिपाई तेथें आला व मला म्हणूं लागला कीं, तूं आज येथे आलास पुन्हां येथें येऊं नकोस. तेव्हा मी म्हणालों कीं मी हिंदु आहें, मुसलमान नाहीं, मी येथें येणारच ; इतकेंच नव्हे तर देवदर्शनाकरितां मी सर्व देवळांत जातों. यावर तो पोलिस शिपाई म्हणाला कीं, जरी तूं हिंदु असलास तरी तूं मुसलमानांपेक्षां नीच आहेस. येवढें आमचें बोलणें झाल्यावर त्या पोलीस शिपायाने पुन्हां थोडीफार गुर्मीची भाषा बोलून मला जावयास सांगितलें, नंतर मग मी माझ्या घरीं गेलों.

सोनू काळू भोपनकर मोरे

चिराबाजार, बोहोऱ्याची चाळ, मुंबई नं. २

पत्रव्यवहार : बहिष्कृत भारत, १५ जुलै १९२७.