परिशिष्ट-३८
श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ?
दुनिया खास टिळक अंक, शनिवार, २-६-१९२८ पान ३ वर ' कै. श्रीधर बळवंत टिळक” (ले. डॉ. भीमराव आंबेडकर) हा बाबासाहेबांचा लेख याच अंकांत पान ३ वर प्रसिद्ध झाला होता. त्याच्या खाली जे लेख प्रसिद्ध झाले होते ते माहितीच्या दृष्टीने चांगले होते. त्यांतील काही महत्त्वाचे भाग येथे उद्धृत करीत आहोत.
'श्रीधर टिळकांची “आत्महत्त्या का कज्जेदलालांनी
पाडलेला खून ?'
लेखक :-केशव सिताराम ठाकरे
गेल्या शुक्रवारी (२५-५-२८) सायंकाळी कै. टिळकांचे 'सु'पुत्र श्रीधरपंत यांनी पुणा एक्सप्रेसपुढे उडी टाकून आत्महत्त्या केल्याचे वृत्त शनिवारी संध्याकाळी मुंबईत व सर्व हिंदुस्थानात श्रुत झाले. . . . मी पुण्यास असताना त्यांचा माझा अलीकडे सतत एक वर्ष निकट परिचय होता. खासगी व्यावहारिक आणि सार्वजनिक शेकडो बाबतीत आम्ही खुल्या दिलाचे विचारविनिमय अनेक वेळा केलेले आहेत. आमच्या कित्येक बैठका सहा सहा तासहि चालत असत. 'चित्पावनद्वेष्टा' ठाकरे आणि 'चित्पावन Rop श्रीधरपंत ही जोडी एकत्र फिरावयाला निघाली असता, कित्येक पुणेरी
गोडबोल्यांची तोंडे कडू जहर
झालेली पाहून आम्ही दोघेही पोट धरधरून हसलो आहोत . . . ते टिळकांचे चिरंजीव असोत, गीतारहस्यांचे मर्मज्ञ असोत, विवेकवादी असोत, कोणीहि असोत. एक गोष्ट कधीहि दृष्टीआड करता येणार नाही की ते इतरांप्रमाणेच
प्रवाहपतित संसारी मनुष्य होते; सिद्धपुरुष किंवा सर्वसंगपरित्यागी नव्हते. कै. टिळकांसारख्या मानधन प्रभूच्या उदरी जन्म घेऊन, या सिंहाच्या छाव्याला, बापाच्या मूर्खपणामुळे, आजुबाजूच्या कोल्ह्याकुत्र्याकडून जो निष्कारण सासुरवास व उपहास नित्य भोगावा लागत असे, त्यामुळे 'आम्हा टिळक बंधूंची स्थिती हॅम्लेट प्रमाणे करण्याचा हितशत्रूंनी विडा उचलला आहे' अशा अर्थाचे उद्गार श्रीधरपंत अलिकडे केवळ बोलतच असत असे नव्हे, तर तसे त्यांनी आपल्या एका लेखात स्पष्ट लिहिल्याचे मी वाचलेले आहे. अखेर श्रीधरपंताच्याच भाकिताप्रमाणे