श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ? - Page 553

श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ? ५०७

त्यांना हॅम्लेटची दुर्दैवी भूमिका यथातथ्य वठविण्याचाच प्रसंग आला. श्रीमंत सकलगुणालंकूत राजमान्य राजेश्री नेन्याच्या विरुद्ध टिळक बंधूंनी दाखल केलेल्या दाव्याबद्दल मी सहज पृच्छा केली असता, श्रीधरपंत स्पष्ट म्हणाले, “A एकाच दाव्याचे काय घेऊन बसलात? कितीक तरी आणखी भानगडी अजून चव्हाठ्यावर यावयाच्या आहेत. त्या एक दोन वर्षांत फडशा पडण्याजोग्या नाहीत. टिळक बंधूंचे प्रकरण म्हणजे दुसरे ताईमहाराज प्रकरण आहे. माझ्या आयुष्याची २५ वर्षे या प्रकरणासाठी मी खास रिझर्व करून ठेविली आहेत. . . '

“. . . केसरी कंपू आणि बंधू यांच्यात ट्रस्ट आणि टिळकांचे बिल याबाबद चुरशीची कायदेबाजी उत्पन्न न होता, टिळक बंधू प्रच्छन्न सुधारक म्हणून ब्राह्मणेतरांच्या किंवा महार मांगादि अस्पृश्यांच्या चळवळींच्या अग्रभागी येऊन उभे राहते, किंवा समाज समता-संघाच्या सहभोजनाच्या खरकट्याच्या पत्रावळींनी सारा गायकवाडवाडा सावडून काढते, तर माझी बालंबाल खात्री आहे की, त्यांच्याबद्दल कसल्याहि प्रकारचा द्वेष, अनादर किंवा उपहास पुण्यात फारसा पिकता ना. . . . जीर्णमतवादी टिळकांचे मुलगे आगरकरांची मते प्रत्यक्ष आचरणात आणू लागले, तर तेवढ्यामुळे पुण्याच्या चित्पावनी हवेला टिळक बंधूविरुद्ध इतके खवळण्याचे वास्तविक काहीच कारण दिसत नाही. माटे नावाचे एक भट मास्तर मांगाशी सलगी करतात, म्हणून ते जर सनातनी ब्रह्माग्नीत सुक्या बोंबलाप्रमाणे भाजले जात नाहीत, तर टिळकबंधूंनी टिळक-दिवाणखान्यात महारमागांना सहभोजन दिले तर त्यात विशेष काय आहे? फार काय तर टिळकांची पोरे बाडगी निघाली एवढे म्हणून लोक गप्प बसते. अर्थात्‌ टिळकबंधूविरुद्ध खुद्द गायकवाड वाड्यातच जो ज्वालामुखी धुमसू लागला, त्याचे कारण टिळकबंधूंचा सुधारकपणा नसून त्यांनी केसरी कंपूच्या कारस्थानावर सरकारदरबारी मारलेली बोंब, हेच होय, आणि श्रीधरपंतांच्या आत्महत्त्येचे मूळ शोधीत शोधीत गेला तर ते अखेर गायकवाडवाड्यात कज्जेदलालांनी भडकविलेल्या कायदेबाजीच्या यज्ञकुंडाच्या आसपासच कोठे तरी सापडले पाहिजे. पण इतका उपद्व्याप कशाला? भालाकारी टायपाचे आचरट माथेफिरू श्रीधरपंतांवर 'मानसिक वेडाच्या लहरी' चा 'आपल्या मृत आईस एका सोनेरी टोळीने छळल्याच्या भ्रामक समजुती' चा किंवा 'नवराबायकोंतील खटक्यां' चा हवा तो आरोप लादोत, पण श्रीधरपंतांनी आपले डोके विचार व विकार समतोल शांत ठेवून आपण आत्महत्त्येचा मार्ग का पत्करीत आहो, याचा लेखी खुलासा पुण्याचे कलेक्टर आणि काही इष्टमित्र यांना पत्रे पाठवून स्पष्ट केलेला आहे. . . .' (पा. ४-५)