MR/Khand_20 - Page 27

संपादकीय

बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) या चार वत्तपत्रांची निर्मिती केली. या चारही वृत्तपत्रांमधून त्यांनी व्यापक व विस्तृत प्रमाणात वैविध्यपूर्ण विचारांचा आविष्कार केला. मूकनायक व बहिकृत भारतातील अग्रलेख व स्फुटलेख याआधीच्या १९ व्या खंडामधून महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रलेखनाचा उर्वरित भाग या २० व्या खंडाद्वारे प्रकाशित करण्यात येत आहे. या खंडांमध्ये १९२९ ते १९५६ या कालखंडातील बाबासाहेबांचे वृत्तपत्रांमधील लेखन संपादित करण्यात आले आहे. हे लेखन बाबासाहेबांच्या उमेदीच्या कालखंडापासून तर त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत आकारास आलेले असल्यामुळे, त्यांचे हे लेखन विशेष मोलाचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले वृत्तपत्रीय लेखन त्यांच्या एकमेवाद्वितीय शैली गुणविशेषांनी मंडित झालेले आहे. या वृत्तपत्रीय लेखनामधून त्यांची भव्यदिव्य पत्रकारिता मूर्तिमंतपणे प्रगट होते. बाबासाहेबांचे मराठी लेखन हे पूर्णतः वृत्तपत्राच्या माध्यमातून आकारास आले आहे. ते अव्वल दर्जाचे पत्रकार होते, याची साक्ष त्यांच्या लेखांच्या पानापानांवरून सिद्ध होताना दिसते. बाबासाहेबांच्या इंग्रजी लेखनाप्रमाणे मराठी लेखन- देखील विलक्षण प्रत्ययकारी आहे. त्यांच्या मराठी लेखनाला ज्याप्रमाणे वैचारिक गुणवत्ता आहे, त्याचप्रमाणे वाडमयीन गुणवत्ता देखील आहे. मराठी पत्रकारितेचे स्मरण करताना टिळक-आगरकर-चिपळूणकर जांभेकर-परांजपे-केळकरांचे नाव नेहमी घेतले जाते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा साधा उल्लेखही साहित्य-विमर्शकांकडून होताना दिसत नाही. अस्पृश्य हे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कायमचे बहिष्कृत राखले गेल्याने बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय वृत्तपत्रसृष्टीने दूरस्थ ठेवणे, हे येथील परंपराशरण समाज संकेतांशी सुसंगतच मानावे लागते.

बाबासाहेबांनी प्रचंड ताकदीने वृत्तपत्रीय लेखन केलेले असले तरी त्यांच्या पत्रकारितेची प्रस्थापित वर्गाकडून दखल घेतली गेली नाही. या संदर्भात श्री. यदुनाथ थत्ते यांनी मोठे मार्मिक वास्तव नोंदविले आहे. ते साधनेत लिहितात, डॉ. आंबेडकर उत्तम मराठी लेखक होते, ही गोष्ट क्वचितच ध्यानी घेतली जाते. त्यांची मराठी भाषा, तिचे सर्व संचित संस्कार घेवून शैलीबद्ध होते, पण ती ग्रंथित करते ते विचार मात्र नवे आहेत. इतकी अस्सल मराठी भाषा लिहिणाऱ्या बाबासाहेबांना मराठी लेखक म्हणून फारशी मान्यता असू नये आणि कोणत्याही