MR/Khand_20 - Page 28

पाठ्यपुस्तकांत त्यांच्या वैचारिक निबंधांना स्थान मिळू नये, हे विक्याक्षेत्र किती कोते आणि कल्पनाहीन आहे त्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेबांचे बरेच लिखाण झाले व पुस्तककारात ते उपलब्ध असल्याने मराठी विचारवंतांना त्यांची गणना करण्याचेही विस्मरण होत असावे. प्रस्थापित सारस्वतांनी डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्रीय योगदानाला दुर्लक्षित केलेले असले तरी आंबेडकरी लेखकांच्या व संशोधकांच्या अथक लेखनातून ही स्थिती पालटत चालली आहे. आयु. रत्नाकर गणवीर, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. अरुण कांबळे, डॉ. यशवंत मनोहर, आयु. वसंत मून आदी अभ्यासकांनी बाबासाहेबांचे वृत्तपत्रीय योगदान जनतेसमोर मांडून ही वाट सूकर केली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित झालेल्या १९ व्या व या २० व्या खंडाच्या रथातून बाबासाहेबांचे वृत्तपत्रीय कार्यकर्तत्व परिपूर्णपणे अखिल मराठीजनात पोहोचणार आहे, ही आमच्याकरिता अत्यंत समाधानाची बाब आहे. |

या खंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत व जनता या नियतकालिकांमधील अग्रलेख, स्फुटलेख, संदेश तसेच प्रासंगिक विचार संग्रहित केलेले आहेत. यासोबतच महत्त्वपूर्ण विषयांवरील परिशिष्टेही स्वतंत्रपणे जोडलेली आहेत. बाबासाहेबांच्या या समग्र लेखनामधून विचारांचा प्रवाह अप्रतिहत वाहताना दिसतो. त्यांचे हे विचार वैविध्यपूर्ण तसेच बहुप्रवाही स्वरूपाचे आहेत. या लेखांमधून ते विविध विषयांचा परामर्श घेतात. या विषयांच्या कक्षाही विस्तृत व सर्वव्यापक आहेत. या लेखनाला कोणताही विषय वर्ज्य नाही. मानवी समाजजीवनाच्या कक्षेत येणारा प्रत्येक विषय ते समर्थपणे हाताळतात. समाजजीवनाच्या नाना अंगोपांगावर ते मौलिक प्रकाश टाकतात व त्या घटकातील अंतस्तत्त्व उलगडून दाखवितात. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन म्हणजे मानवी जीवनास उन्नत करणारे चिंतन होय. हे चितन कधी समाजशास्त्रांच्या अंगाने आकारास येते, कधी धर्मशास्त्राच्या अंगाने अस्तित्वात येते. कधी ते अर्थशास्त्राच्या, कधी राज्यशास्त्राच्या तर कधी इतिहासाच्या अंगाने प्रगट होते. बाबासाहेब हे प्रकांडपंडित होते. सामाजिक शास्त्रांचे व मानव्यविद्यांचे त्यांना सखोल ज्ञान होते. पाश्चात्य ज्ञान-विज्ञानावर त्यांची बुद्धी पोसली गेली होती. इहवादी व विज्ञानवादी विचारांना त्यांनी आत्मसात केले होते. लोकशाही मूल्यांवर.अधिष्ठित असणाऱ्या समताविचारांच्या रसा-कसावर त्यांच्या मनाची जडणघडण झाली होती. त्यांचे ज्ञान अद्यावत स्वरूपाचे होते व त्यांच्या नित्यनूतन ज्ञानाला तत्त्वशुद्धतेची बैठक प्राप्त झाली होती. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे असे प्रखर बुद्धिनिष्ठ असल्यामुळे त्यांचे लेखनही या सर्व गुण विशेषांसह सर्वस्पशित्वभावाने आविष्कृत होते.

(चोवीस)