२९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
करू शकतो? मि. झकेरियस यांनी केलेले खिलाफतीचे वर्णन अगदी बरोबर आहे. अहिंसा व्रत धारण करणाराच्या कार्याचा त्यांनी केलेला अंदाज मात्र चूक आहे. कोणत्याही गोष्टीच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने भौतिक शक्तीचा उपयोग अत्याचारी मार्गाने करणे अहिंसावाद्याचे ब्रीद नव्हे, हे जरी खरे असले, तरी अमुक एक संस्था अहिंसेवर आधारलेली नाही म्हणून तिला किंवा तिच्यात असलेल्या लोकांना सहाय्य करण्याला अहिंसावाद्याला प्रतिबंध करण्यात आलेला नाही. असे जर नसेल तर, उदाहरणार्थ, हिंदुस्थानला स्वराज्य संपादनासाठी मदत करण्याला मला प्रतिबंध होईल. कारण हिंदुस्थानचे भावी स्वराज्यातील पार्लमेंट थोडे तरी लष्कर आणि पोलिस ठेवणारच. घरगुती उदाहरण घ्यावयाचे तर, माझ्या मुलाचा अनत्याचारावर विशवास नाही म्हणून त्याला न्याय मिळवून देण्याला मला मदत करता येणार नाही.
मिस्टर झकेरियस यांचा मुद्दा मान्य केला तर अहिंसावाद्याला कोणताही व्यापारधंदा करणे अशक्य होईल आणि पूर्ण अहिंसा म्हणजे पूर्ण निष्क्रियता असे मानणारे लोकही काही कमी नाहीत. माझे अहिंसातत्व मात्र असे नाही. स्वतःला कोणत्याही अत्याचारापासून परावृत्त करणे आणि माझ्याप्रमाणेच श्रद्धा आणि आचरण ठेवण्याविषयी ईश्वराच्या जितक्या प्राण्यांचे त्यांच्या बुद्धीला पटवून देऊन आणि त्यांची सेवा करून मन वळविता येईल तितके वळवणे हे माझे काम आहे. परंतु माझ्या अहिंसा तत्वाशी ज्यांचा पूर्ण मेळ बसत नाही अशा लोकांना किंवा अशा कार्यांना त्यांची बाजू रास्त असतांना देखील सहाय्य करण्याचे मी टाळले तर मी माझ्या श्रद्धेला जागलो नाही, असेच म्हणावे लागेल. मुसलमानांची बाजू रास्त आहे असे कळून आल्यावर, इस्लाम धर्माचा दर्जा नष्ट करण्यासाठी कट करणाऱ्या विश्वासघातकी लोकांच्या विरुद्ध निव्वळ अनत्याचारी साधनांनी मी मुसलमानांना मदत केली नाही तर मी अत्याचाराला प्रोत्साहन देत आहे, असाच त्याचा अर्थ होईल. अत्याचारावर विश्वास ठेवणारे दोन पक्ष ज्यावेळी परस्पराशी झगडत असतील त्यावेळी त्यांच्यापैकी ह्या किवा त्या पक्षाच्या बाजूला न्याय हा बहुधा असतोच. ज्याची मालमत्ता लुटली गेली असेल, अशा माणसाने आपली गमावलेली मालमत्ता जबरदस्तीने परत मिळवण्याची तयारी केली तरी देखील त्याची बाजू न्यायाचीच असते आणि अनिर्बध लढा करण्याऐवजी किंवा आत्मसामर्थ्यानि म्हणजे सत्याग्रहाच्या मार्गाने आपली मालमत्ता परत मिळविण्याविषयी, ज्याचे नुकसान झालेले आहे अशा माणसाचे मन वळविणे शक्य झाले तर अहिंसा तत्वाचा तो एक फार मोठा विजय झाला असेच मानावे लागेल. अर्थात अहिंसेला ज्या ह्या अनेक मर्यादा मी घातल्या आहेत त्यामुळे अहिसाभक्त म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही असे मिस्टर झकेरियस यांना म्हणता येईल.