आहे व आत्मविश्वासही आहे. बाबासाहेबांच्या विचारांची तात्विक बैठक ही अगदी तर्कशुद्ध व बुद्धिनिष्ठ असल्यामुळे त्यांची लेखनशैली त्याच ताकदीने झळाळताना व लखलखताना दिसते. बाबासाहेबांचा निबंध रात्रंदिन चाललेल्या युद्धाच्या प्रसंगात सरसेनापतीची भूमिका वठवितो. हा निबंध एकाच वेळेस सवर्णांशी वाद घालतो, अस्पृश्यांशी संवाद साधतो व राष्ट्राच्या उज्ज्वलतेची समतोल भूमिका घेतो. बाबासाहेबांचा स्वभावधर्म “ दुर्जनांशी पंचानन, तुका रजवेणू संताचा " असा आहे. या वैचारिक जडणघडणीतून त्यांची लेखनशैली नित्यनूतन आविष्कार धारण करीत जाते. त्यांच्या लेखनामध्ये संतांची वचने, संस्कृतातील वचने, सुभाषिते, म्हणी व वाक्प्रचार विपुल प्रमाणात दिसतात. विचारांच्या प्रभावी प्रगटीकरणासाठी ते दृष्टांत व रूपकांचा अचूक उपयोग करतात. आशयाची मुद्रा वाचकांच्या मनावर ठसविण्यासाठी ते कथासामर्थ्याचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे करतात. उपरोध, उपहासाच्या साहाय्याने ते प्रतिपक्षाचा दंभस्फोट करतात. बाबासाहेब आंबेडकर हे भौतिकवादी जाणीवेचे निबंधकार असल्यामुळे हा निबंध तर्काची व तत्त्वाची साथ कधीही सोडत नाही. बाबासाहेब हे प्रज्ञावंत विचारवंत आहेत, त्याचप्रमाणे प्रतिभावंत विचारवंत आहेत. प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा अद्भूत संगम बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात झाल्यामुळे त्यांचे लेखन विलक्षण वाचनीय, चिंतनीय व मननीय ठरते.
या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अग्रलेख, स्फुटलेख, संदेश, लेख इत्यादी अंतर्भूत करताना त्यांनी लेखांस जी शीर्षके दिली होती, ती तशीच कायम ठेवण्यात आली आहेत. ज्या लेखांना, विशेषतः स्फुट लेखांना त्यांनी शीर्षके दिली नव्हती, त्यांना आम्ही त्यातील आशयानुरूप शीर्षके दिली आहेत. ही शीर्षके लक्षात येण्यासाठी ती इटॅलिकमध्ये खंड १९ प्रमाणेच नमूद केली आहेत. तत्कालीन महत्त्वपूर्ण घटना प्रसंगांवर भाष्य करणारी परिशिष्टे येथे विशेषत्वाने जोडलेली आहेत. बाबासाहेबांनी विचाराविष्कार करताना देश-विदेशातील अनेक विद्वान लेखकांच्या विचारांचा, कार्याचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे विविध ऐतहासिक, समाजशास्त्रीय तत्त्वसरणीचा तत्त्वज्ञांच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्या लेखनात परामर्श घेतला आहे. त्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्याची विषयाच्या . दृष्टीने माहिती होणे अगत्याचे असल्यामुळे त्यांच्याविषयीची आवश्यक ती माहिती '' व्यक्ती, संस्था, कार्य-सूची '' या विभागात दिलेली आहे. याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या लेखनात कांही महत्त्वपूर्ण घटना लक्षात घेवून विचार प्रदर्शित केले आहेत व त्या घटनांची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आहे. डॉ. आंबेडकरांनी काही लेखन स्वतः केले असले तरी प्रसंगानुरुप त्यांनी आपले नाव तृतीय वचनी लिहिले आहे. ही सर्व माहिती परिशिष्टात अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
संपादक
(एकतीस)