विद्यावंचित असलेल्या अस्पृश्य वर्गाकरिता नवविचार हे जीवनदायी ठरत असतात. लोकशिक्षणाशिवाय अस्पृश्य समाज हा जागृत होऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी पक्के ओळखल्यामुळे त्यांची वृत्तपत्रांच्या द्वारे जनप्रबोधनाचे कार्य अप्रतिहत सुरू ठेवले. या देशातील समस्त शोषित वंचितांना परिवर्तनकारी विचार देणारे विचारवंत या नात्याने बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व अनन्यसाधारण [ठरते. ] [ते ] प्रबोधनकारी लोकशिक्षक होते तसेच समाजशिक्षकही होते. स्त्री-शूद्वातिशूद्वाना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी निक्षून सांगितले. शिक्षणाच्या, उच्च शिक्षणाच्या द्वारेच अस्पृश्यांच्या जीवनात स्वातंत्र्यसूर्य उगवू शकतो, याबद्दल ते निःसंदिग्ध होते. औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी कॉलेजच्या शिलान्यास प्रसंगी बाबासाहेबांनी व्यक्त केलेले शिक्षण विचार अत्यंत मननीय आहेत. ते म्हणतात, “ हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंदून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागले, तो न्यूनगंड त्यांच्यापासून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन लुबाडण्यात आले त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज दुसऱ्या कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे हेच औषध आहे. “ बाबासाहेबांनी व्यक्त केलेले हे शिक्षणविषयक विचारसूत्र विलक्षण अन्वर्यक आहे. शिक्षण हेच दलित मुक्तीचे केन्द्रवर्ती तत्त्व होय, ही बाबासाहेबांची विचारसरणी मोठी द्रष्टेपणाची मानावी लागते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यकुळाच्या निबंधपरंपरेतील अत्यंत जहाल आणि श्रेष्ठतम निबंधकार आहेत, त्यामुळे त्यांच्या निबंधामधील विचारविश्वच केवळ धगधगत आहे असे नाही तर त्यांच्या गद्यशैलीमधूनही तीच धगधग, तोच बेदरकारपणा प्रत्ययास येतो. बाबासाहेबांच्या गद्यशैलीला एक घाट, एक वळण आहे. प्रतिपाद्य विषयाच्या गाभ्याला ते बेधडक स्पर्श करू शकतात. प्रतिपाद्य विषय हा सर्वसामान्यांचा साधारण अनुभव असो अथवा तात्विक पातळीवरचा अगम्य सिद्धांत असो, त्या आशयाला त्यांची गद्यशैली लीलया पेलते. आपले लेखन हे वरिष्ठ वर्गास आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी व अस्पृश्य वर्गास आत्मभान आणण्यासाठी आहे, याचे भान त्यांनी कधीही सोडले नाही: त्यामुळे त्यांची लेखनशैली दुर्बोध, बोजड व कृत्रिम न होता ती सुबोध, सुगम, अर्थगर्भ व स्वाभाविक स्वरूपाची बनते. या लेखनशैलीमध्ये आक्रमकता आहे, आवेशपूर्णता
(तीस)