ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य, - Page 411

ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य ३६९

ती त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी. ऐकणाराला कदाचित हे क्रूर वाटेल. पण त्या लहान मुलालां ' देव.' करण्याच्या महान तळमळीने आणि प्रेमानें ती हे करीत असे. हळूहळू जळत्या निखान्याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झालें. त्याचे बळ वाढूं लागले. त्याच्यामध्ये कांही तरी तेजस्वी, दिव्य, अतिमानुष अंश विकसित होऊं लागला. पण एके रात्री त्याची आई एकाएकी खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा ' नारायण ' करण्याचा देवतेने चालविलेला तो प्रयोग बघतांच तिने त्या देवतेला ढकलून दिले. आणि निखाऱ्यावरून मूल एकदम उचलले. अर्थात तिचे मूल तिला मिळाले, पण एका अतिमानुष पुत्राला, एका देवाला मात्र ती मुकली. ''

ही गोष्ट काय सांगते ? हेंच की, विस्तवातून गेल्यावाचून पौरुष किंवा देवपणा प्राप्त होत नाही ! अग्नीमधून गेल्यावांचून माणसाची शुद्धी होत नाही, आणि त्याचे बळ वाढत नाही. म्हणून पददलित माणसांना हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यांतून गेल्यावांचून मोठेपणा प्राप्त होणार नाही ! आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना ' वर्तमानकाळातील सुखांचा आणि गरजांचाही त्याग करावयाला पाहिजे.' बायबलमध्ये सांगितले आहे कीं, आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते, पण फार मोठे लोक त्यातून उत्तीर्ण होतात, असे कां ?. त्याचें कारण हेंच कीं भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करायला लागणारे धैर्य किंवा निर्धार पददलित माणसाजवळ नसतो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही. ह्या ग्रीक गोष्टीपेक्षां अधिक महान संदेश कोणता आहे ? माझ्या मते अस्पृश्यांना तर हा सर्वोत्कृष्ट संदेश आहे. त्यांच्या झगड्यांची आणि हालांची मला जाणीव आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी माझ्याहीपेक्षा त्यांनी छळ सोसला आहे. सें असूनही मी त्यांना हाच संदेश देतो आहे की, ' झगडा, आणखी झगडा, त्याग करा, आणखी त्याग करा. त्यागाची आणि हालाची पर्वा न करतां एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ति मिळेल ।' जागे होऊन प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ति वाढली पाहिजे ! आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे. आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे. अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे,

आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की, त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी

की : "ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणें आपलें कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत । गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन, मन, धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत.