परिशिष्ट-७
जळगांवचे (वर्हाड) महार मुसलमान झाले
(आमच्या बातमीदारांकडून)
जळगांव (वऱ्हाड)* येथील सुमारें एक हजार महारांच्या सह्यानिशी स्पृश्य लोकांना उद्देशून एक निर्वाणीचा जाहीरनामा पूर्वी निघाल्याचें जाहीर झालेच आहे. सदरहू जाहीरनाम्यात आम्हांस विवक्षित मुदतींत इतर हिंदुप्रमाणें समानतेचे हक्क न दिल्यास आम्ही खिस्ती किंवा मुसलमान धर्मात प्रवेश करू असें जाहीर झाल्यामुळें तेथें बरीच खळबळ उडाली होती. हा जाहिरनामा प्रसिद्ध करण्याचें कारण कांहीं ब्राह्मण, हिंदुसभा व आर्यसमाजिष्ट सभांतून वारंवार अस्पृश्य निवारणाचा ठराव पास करीत असत. या त्यांच्या ठरावाची कसोटी पाहावी म्हणून कांहीं महार पुढाऱ्यांनी ब्राह्मणांना व हिंदुमहासभावाल्यांना जाहीर रीतींने सवाल केला कीं, ठराव नुसते पास होऊन उपयोग नाहीं त्याप्रमाणें प्रत्यक्ष कृति करून दाखवा. या सवालास त्यांनीं असें उत्तर दिलें की तुम्ही अस्पृश्य वर्गातील महार, मांग, चांभार वगैरे जातींनी एकत्र सहभोजन करा म्हणजे आम्ही सभेत पास केलेल्या ठरावाप्रमाणें प्रत्यक्ष कृति करून दाखवु. याप्रमाणे जळगांव येथील महार पुढाऱ्यांनी तसा प्रसंग घडवून आणून सहभोजन केले. परंतु या गोष्टीचा फायदा स्पृश्य वर्गातील कांही मुर्ख लोकांनी निराळ्याच रीतीनें घेतला. त्यांनी आसपासच्या गांवच्या महार लोकांना जाऊन चिथविलें कीं जळगांवचें महार लोक मांगाबरोबर जेवले हा भ्रष्टाकार तुम्हाला पसंत आहे कां? तुमच्या वाडवडिलांनीं असें कधींच केलें नव्हते. म्हणून तुम्ही जळगांवच्या महार लोकांवर बहिष्कार टाका. त्याप्रमाणें त्या अडाणी महार लोकांनीं जळगांवच्या महार लोकांवर बहिष्कार टाकला. पुढें हें कृत्य कोणाच्या चिथावणीनें झाले हें कळून आल्यामुळें ब्राह्मण व इतर स्पृश्य हिंदूच्या आत्मघातकी वागणूकीमुळें अन्यायाची चीड येऊन वरील जाहीरनामा प्रसिद्ध करण्यांत आला होता. या त्यांच्या धर्मातरास ता. २९-५-१९२९ रोजीं पातुर्डा मुक्कामी भरलेल्या परिषदेनेही पाठिंबा दिला. ठरल्याप्रमाणें ता ४ जून १९२९ रोजी बरेचसे महार मुसलमान झाले. हिंदुमहासभावाले आर्यसमाजिष्ट या मंडळीनें त्यांनीं मुसलमान
* जिल्हा बुलडाणा (महाराष्ट्र) बहिष्कृत भारत, ता. २१ जून १९२९.