परिशिष्ट-६
चवदार तळ्याचा दावा
महाडचे बातमीपत्र
(आमच्या बातमीदाराकडून)
चवदार तळ्याच्या दाव्यांत दोन्हीं पक्षांनी आपआपल्य़ा साक्षी याद्या दिल्या आहेत. दाव्याचें पुढील काम जूनमध्यें चालेल. चवदार तळ्याची म्युनिसिपालिटीच्या मालकीची एक पाळी मागील वर्षाच्या पावसानें कोसळली होती. या पाळीशेजारून गांवचा एक सार्वजनिक रस्ता जात आहे. या कोसळलेल्या पाळीमुळें हा सार्वजनिक रस्ता आज ७/८ महिने रहदारीस बंद झाला होता, परंतु चवदार तळ्याची पाळी बांधण्याचें काम नुकतेंच म्युनिसिपालिटीनें सुरू केलें असल्यानें पाळीस जोडून असलेल्या स्वतंत्र रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर पुरे होईलसें वाटतें. रस्ता ७/८ महिने नादुरुस्त व त्यामुळें १।। पुरुषाचा खड्डा पडलेला ! अशा स्थितींत रात्रीं कोणीही त्या खड्ड्यात पडलें नाहीं, हें नागरिकांचे सुदैव ! या बाबतींत महाड म्युनिसिपालिटी फार लवकर जागी झाली | “महारांनीं चवदार तळ्यांत खुशाल पाणी भरावें आपणांस त्याच्याशीं कांहीं कर्तव्य नाहीं ” असें म्हणणारा एक नवीनच उपपक्ष येथें निर्माण झाला आहे. ह्या उपपक्षाभिमानी लोकांनीं आपआपल्या आवारांत विहिरी खणण्याचें व चवदार तळ्याच्या पाण्यावर बहिष्कार घालण्याचें ठरविलें आहे. या उपपक्षाच्या जन्मामुळे पुराणमतवादी सनातनाभिमानी तटवाल्यांची धाबीं दणाणून गेलीं आहेत.
“चवदार तळ्याची एकंदर परिस्थिति व सुधारणेच्या काळांतील भवितव्यता लक्षांत घेऊन घरोघर लवकर विहिरी खणाव्यात” असा प्रचार कांहीं मंडळी येथे करीत आहेत. प्रचारानुरूप सनातन तत्त्वांच्या संरक्षणार्थ विहिरी खणण्याचा उपक्रम धडाक्यानें सुरू झाला आहे. उपक्रमाचा अग्रमान येथील एक रहिवासी मामाराव भोळे यांनी मिळविला. त्यांनीं चवदार तळ्यास हडसून असलेल्या जागेंत एक बुडखी खणली असून चवदार तळ्याच्या संपर्काचे पाणी आडपडद्यानें बुडखींत घेतलें ! व आपलें सोवळे राखलें. soi
बहिष्कृत भारत, ता. ३१ मे १९२९.