५७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
घडविलेली असतात, उपभोगाची वा जीवनाची सर्व साधने मानवी श्रमातून निर्माण होतात. तात्पर्य, वस्तूंमध्ये मूल्य निर्माण होते ते श्रमशक्तीच्या वापरामुळे; यालाच श्रममूल्याचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे कामगार आपल्या श्रमांनी सर्व मूल्ये निर्माण करतात; परंतु, सर्व मूल्य त्यांच्या हाती येत नाही; त्याचा अल्प भागच येतो. त्याच्या हातांत उरते ते फक्त मजुरीच्या रुपाने मिळणारे मुल्य. मजुरीचाही अपरिवर्तनीय असा कायदा आहे. मार्क्सने तो' डेव्हिड
रिकार्डो या इंग्रजी अर्थशास्त्रवेत्याकडून घेतला. या कायद्याप्रमाणे स्वतःच्या व कुटुंबियांच्या ,जगण्यासाठी-संतती जगविण्यासाठी जरूर लेवढीच मजुरी कामगाराला मिळू शकते. श्रमातून निर्माण झालेल्या मूल्याचे दोन भाग; एक भाग कामगाराचे वेतन व दुसरा शिल्लक भाग म्हणजे अतिरिक्त मूल्य; ते नफा म्हणून उत्पादन साधनावरील मालकीमुळे'भांडवलदाराच्या पदरात पडते. यांत्रिक शोधामुळे उत्पादन सारखे वाढत जाते; त्यामुळे अतिरिक्त मूल्य वा नफा अधिकाधिक निर्माण होतो. तो पदरात पडल्यामुळे भांडवलदार वर्ग अधिकाधिक श्रीमंत व समर्थ बनतो आणि कामगार वर्ग व तो यांच्यामधील दरी वाढत जाते.
अशा रीतीने समाजामध्ये दोन वर्ग तयार होतातः एक श्रीमंत भांडवलदारांचा आणि दुसरा गरीब आणि दिवसेंदिवस अधिकाधिक गरीब होणाऱ्या कामगारांचा. कालानुक्रमे मधले वर्ग नष्ट होतात वा दुर्बल होतात; आणि भांडवलदार व कामगार हे दोनच वर्ग युद्धाच्या पवित्र्यात एकमेकांसमोर उभे ठाकतात. भांडवलशाही समाजाच्या अखेरच्या परिस्थितीचे हे मार्क्सवादी भविष्य आहे.
भांडवलशाहीची चौकट मोडण्याचा व त्या पलीकडे जाण्याचा मार्गही मार्क्सवादाने दाखवून दिलेला आहे. क्रांती अटळ आहे, हा मार्क्सवादाचा सिद्धांत. समाजातील अत्यंत नाडलेला, पिडलेला वर्ग जो कामगारांचा, तो ही क्रांती घडवून आणील. कामगार सुरुवातीला आपले कारखानानिहाय संघ बनवतात. ते संघ या घडीच्या मागण्याही मिळविण्यासाठी असतात. हलके हलके ते संघटन वाढत जाते व त्याला राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त होते. लवकरच कामगार राजकीय मागण्याही करू लागतात. त्यासाठी ते आपला राजकीय पक्षही बनवतात. राजसत्ता हस्तगत करण्याची आवश्यकता त्यांना भासू लागते. दरम्यान त्यांची दुरवस्था, गरिबी, बेकारी वगैरे वाढलेली असते. मग क्रांती. करून भांडवलशाही व तिचे राज्य उलथून पाडण्याखेरीज दुसरा मार्ग त्यांच्यापुढे उरत नाही. कामगारवर्ग भांडवलदारवर्गापुढे लढाईसाठी उभा ठाकतो. यावेळी कामगारवर्गाचे सामर्थ्य व संख्याबल खूप वाढलेले असते व भांडवलदारवर्गाचे