परिशिष्टे - Page 613

परिशिष्टे . ५७१

खूप कमी झालेले असते. भांडवलशाहीचा पराभव होतो आणि तिच्या जागी कामगारांचे राज्य येते. ही क्रांती सशस्त्र क्रांती असते आणि तिच्यामध्ये रक्तही सांडावे लागते. इंग्लंडसारख्या अपवादभूत देशांमध्येच ती शांततेनेही पार पडू शकेल असे मार्क्सला कालांतराने वाटू लागले. (पुढे लेनिनचे मत पडले की तोही अपवाद शक्‍य नाही) ही रक्तरंजित क्रांती यशस्वीपणे पार पाडवायाची म्हणजे कामगारांची जय्यत तयारी हवी. त्यांचा शिस्तबद्ध व लढाऊ असा पक्ष हवा. तोच साम्यवादी पक्ष, असा पक्ष यूरोपमधील औद्योगिक क्रांती झालेल्या प्रत्येक देशात उभा रहावा असे मार्क्सवादाचे उद्दिष्ट होते. विसाव्या शतकात मार्क्सवादाचा जगभर प्रसार झाला आणि अनेक देशांत मार्क्सवादी साम्यवादी पक्ष निर्माण झाले.

क्रांतीनंतर जी वर्गहीन समाजव्यवस्था निर्माण होईल तिच्याबद्दल मार्क्सने फारसे काही लिहिलेले नाही. साम्यवाद ताबडतोब स्थापन होणार नाही, हा इशारा मात्र त्याने स्पष्टपणे दिलेला आहे. संक्रमण काळात कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित होईल असे मार्क्सने एके ठिकाणी जाता जाता लिहिले आहे.

शासन व शोषण विरहित स्वतंत्र व समान व्यक्तींचा स्वतंत्र समाज हे मार्क्सवादाचे अंतिम राजकीय उद्दिष्ट आहे. राज्य वा शासन लागते ते वर्गीय समाजात; वर्ग नष्ट झाले, वर्गीय पिळवणूक नष्ट झाली, की राज्याची व शासनाची गरज उरत नाही. मग माणसावर राज्य करायचे नसते, तर वस्तूंचे वाटप करायचे असते, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे धन मिळावे व त्याच्या कुवतीप्रमाणे काम त्याने द्यावे, हे साम्यवादाचे स्वप्न होते.

मार्क्सवादाची काही भाकिते खरी ठरली नाहीत. त्यांपैकी एक-दोन भाकितांचा उल्लेख या ठिकाणी प्रस्तुत ठरेल. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या भांडवलशाही देशांत कामगार क्रांती अगोदर घडून येईल, असा मार्क्सवादाचा अंदाज होता. त्याप्रमाणे इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स अगर अमेरिका या देशांत कामगार क्रांती अगोदर घडून यायला हवी होती; पण ती घडली १९१७ साली औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या रशियात. त्यानंतर पासष्ट वर्षे उलटून गेली तरी त्या चार देशात साम्यवादी क्रांतीची चिन्हे दिसत नाहीत. यांवरून धडा घ्यायचा तो एवढाच की उद्योगधंदे वाढले की कामगार क्रांतिप्रवण होतात, असे नाही. दुसराही एक अंदाज खोटा ठरला तो हा की भांडवलशाहीच्या वाढीबरोबर कामगारांचे दैन्य व दारिद्र्य वाढेल, ते घडलेले नाही. उलट