६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
व चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करून अशा विषम, हिरमोड करणाऱ्या परिस्थितीत बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनीही आपले शील व कर्तव्य सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा उपदेश केला. सुशिक्षित असूनही केवळ अस्पृश्य मानले गेल्यामुळे बहिष्कृतातील लायक माणसांची कशी कुचंबणा होते हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जेव्हा पटविले त्यावेळी सभागृहात भीषण गांभीर्य पसरले. डॉक्टरसाहेब मनापासून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या जीवाची तळमळ व मनाची खळबळ त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रतिबिंबित होत होती. एकंदरीत अध्यक्षांचे भाषण अस्खलित, जोरदार व चित्ताकर्षक झाले. नंतर आभारप्रदर्शन झाल्यावर अध्यक्षास पुष्पहार घालण्यात आला व अशारीतीने हा संस्मरणीय प्रसंग पार पडला. |