अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ६७
येईल. हिंदू धर्मीय लोकांच्या आचारात एक मोठी गंमत आहे. ती ही की, जोपर्यंत एखादा माणूस हिंदू समाजाचा घटक असतो तोपर्यंतच हिंदू धर्माने घालून दिलेल्या श्रेयानिःश्रेयाचे, पापपुण्याचे व स्पर्शास्पर्शाचे यमनियम त्याला लागू पडतात. परंतु त्याच माणसाने जर हिंदू धर्माचा लागाबांधा तोडला व निराळ्या धर्माचा, समाजाचा घटक झाला तर त्याला हिंदू धर्माने घालून दिलेले श्रेयानिःश्रेयाचे, पापपुण्याचे व स्पर्शास्पर्शाचे यमनियम लागू पडत नाहीत. त्याला मानव धर्माने घालून दिलेल्या श्रेयानिःश्रेयाच्या, पापपुण्याच्या व स्पर्शास्पर्शाच्या यमनियमाप्रमाणे वागविण्यात येते. अस्पृश्यांचा जसा स्पृश्य लोक विटाळ मानतात तसा कुत्र्यामांजरांचा अगर मुसलमानांचा का मानीत नाहीत या प्रश्नाचे उत्तर यातच आहे. अस्पृश्यांना हिंदू धर्माशी लागाबांधा असल्यामुळे त्यांना हिंदू धर्माच्या यमनियमाप्रमाणे वागविले जाते. कुत्र्यामांजरांचा तसाच मुसलमानांचा हिंदू धर्माशी लागाबांधा नसल्याकारणाने त्यांना मानव धर्माच्या यमनियमाप्रमाणे वागविण्यात येते. ही खुबी अस्पृश्यांना माहीत नाही असे नाही. त्यांना पूर्णपणे माहीत आहे की, एखादा अस्पृश्य हिंदू धर्मात राहिला असता त्यास स्पृश्य हिंदुंकडून कमी लेखण्यात येते. परंतु तोच खिस्ती किवा मुसलमान झाला तर त्यास तेच हिंदू लोक असे आपल्यासमान वागवितात. तथापि, अस्पुश्यतानिवारणाचा हा साधा सोपा उपाय न करता परधर्मात जाऊन हिंदुधर्मास क्षय लागू देण्याऐवजी त्यातच राहून आपल्यात असेल तितकी शक्ति खर्च करून आपली माणुसकी मिळवावी, असा जो त्यांनी निश्चय केला आहे, त्यावरुन त्यांनी आरंभिलेले कार्य स्वतः च्या उद्धारापुरते नसून हिंदू धर्माच्या उद्धाराकरिता आहे, हेच खरे आहे. तसेच जे अस्पृश्य लोक ही चळवळ करीत आहेत त्यांच्या ठायी समभाव नाही, असेही कोणास म्हणता यावयाचे नाही. कारण अस्पृश्यांची मागणी विशेष हक्कासाठी नसून ती समान हक्कासाठी आहे. हिंदुमात्राचे जे हक्क आहेत ते फक्त आम्हालाच असावेत इतरांना असू नयेत, अशी काही अस्पृश्यांची मागणी नाही. स्पृश्यांना जे हक्क आहेत, तसेच हक्क आपल्यालाही असावेत अशी त्यांची समतेची मागणी आहे. यास्तव गीतेत सांगितलेल्या कसोटीला लावून पाहिली असता अस्पृश्यांचा आग्रह हा सत्याग्रह आहे असेच म्हणावे लागेल. |
अस्पृश्यांचे कार्य हे राष्ट्रकार्य आहे असे कबूल करूनही अस्पृश्यास देवळात प्रवेश करण्याचा मुळी अधिकारच नाही असे म्हणणारे काही समाजकंटक आढळतात. त्यापैकी, काही जणांचा युक्तिवाद दिसावयाला इतका मोहक दिसतो की, तो वाचून आपली बाजू लंगडी आहे की काय असा भ्रम उत्पन्न होतो. या विरोधी लोकांचे असे म्हणणे आहे की, स्पृश्यांच्या देवळात गेल्यानेच उपासना घडते म्हणून जर अस्पृश्य लोक देवळात जाण्याचा प्रयत्न