७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्यांसही कबूल करणे प्राप्त आहे. तेवढ्यावरून स्पृश्यांना तुम्ही आपली मंदीरे आम्हास खुली करून द्या असे म्हणण्याचा हक्क अस्पृश्यांस पोचत नाही हे कोणीही कबूल करणार नाही. कारण ही देवळे जरी स्पृश्यांनी बांधिली असली तरी ती हिंदू धर्माची असून हिंदुधर्मियांकरिता बांधलेली आहेत. हा दाय एकाने कोणी केला असला तरी तो सर्व हिंदूंच्या उपयोगाकरीता केलेला आहे. अर्थात जो हिंदू आहे त्या दरेकाला या देवळात जाऊन उपासना करण्याचा अधिकार प्राप्त होतोच. तसेच हिंदुत्त्व ही जितकी स्पृश्यांची मत्ता आहे तितकीच अस्पृश्यांचीही आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा. जितकी वसिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी व तुकारामासारख्या शूद्रांनी केली तितकीच वाल्मिकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनीही केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासही हजारो अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातलेली आहे. व्याधगीतेतील अस्पृश्यद्रष्ट्यापासून तो खर्ङ्चाच्या लढाईतील सिदनाक महारापर्यंत ज्या अस्पृश्यांनी हिंदुत्त्वाच्या संरक्षणार्थ आपले शीर हातावर घेतले त्यांची संख्या लहानसहान होणार नाही. ज्या हिंदुत्वाची रास स्पृश्य व अस्पृश्य या उभयतांनी मुठमुठ टाकून वाढविली आणि तीवर घाला आला असता जिवाची पर्वा न करिता तिचे रक्षण केले, त्या हिंदुत्त्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरे जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांचीही आहेत. त्यावर जितका स्पृश्यांचा तितकाच अस्पृश्यांचा वारसा आहे. एक अधिकारी व दुसरा उपरी असे कधीच म्हणता यावयाचे नाही. अस्पृश्य लोक उपरी नाहीत ते हिंदू आहेत. हिंदू धर्म त्यांचा आहे व ते हिंदू धर्माचे आहेत. एवळ्यावरूनच हिंदुंच्या मंदिरावर अस्पृश्यांचा वारसा आहे ही गोष्ट सर्वास कबूल करणे प्राप्त आहे आणि वारसा मान्य केला, मग जुन्या वहिवाटीचा प्रश्नच शिल्लक राहात नाही. कारण कायद्याच्या दृष्टीने पाहता सार्वजनिक बाबतीतील व्यक्तिमात्रांचा हक्क कोणास काही सनद देऊन निर्मित करावयाचा नसतो, तो दरेकाच्या अंगी कायमचा वसत असतो. त्याची वहिवाट नसली किंवा त्याच्या वहिवाटीत जरी खंड पडला असला तरी तेवढ्यावरून तो हिरावला जात नाही. एखादा मनुष्य पूर्वी एकाद्या रस्त्यावरून गेला नाही म्हणून त्यास पुढे त्या रस्त्यावरून जाता येणार नाही हे म्हणणे जितके मूर्खपणाचे होणार आहे तितकेच तो एखाद्या सार्वजनिक पाणवठ्यावर अथवा देवालयात पूर्वी कधी गेला नाही म्हणून त्यास आता जाता येणार नाही हे म्हणणे मूर्खपणाचे होणार आहे. तेव्हा हे न्यायाचे पारडे आपल्याकडे फिरत नाही व आपला जो आग्रह आहे तो सत्याग्रह आहे, याबद्दल कोणाही अस्पृश्याने आपल्या मनात कोणत्याही प्रकारची शंका