१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 113

अस्यृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ७१

बाळगण्याचे काही कारण नाही. इतकेच नव्हे तर हिंदू धर्माला उर्जीत अवस्थेस आणून त्यास साऱ्या मानवाचा धर्म व्हावा म्हणून त्यास मानव धर्माचे रूप देण्यासाठी अवतरलेले आपण देवदूत आहोत असेही त्यांनी मानण्यास काही हरकत नाही.

येथवर अस्पृश्यांचा समान हक्क मिळविण्याचा जो आग्रह आहे. तो सत्याग्रह आहे किंवा नाही, याची चर्चा केली आहे. आता हा सत्याग्रह अस्पृश्य लोकांनी पार कसा पाडावयाचा याचा विचार करू. प्रथमतः: सत्याग्रहाची रीत कशी असावी हे निश्चित झाले पाहिजे. महात्मा गांधी हे आधुनिक काळातील सत्याग्रहाच्या चळवळीचे पुरस्कर्ते आहेत. आणि सत्याग्रहाची रीत म्हणजे म. गांधींनी घालून दिलेली रीत याशिवाय दुसरी रीत असू शकणार नाही, असा समज सर्वत्र पसरलेला दिसतो. म. गांधींच्या सत्याग्रहाची जी रीत आहे तीत ` त्यांनी हिंसेला वाव ठेवलेला नाही, इतकेच नव्हे तर, जेथे हिंसा आहे तेथे सत्याग्रह नाही असे त्यांचे मत आहे. हे म. गांधींचे म्हणणे तर्कशुद्ध आहे ह्याबद्दल एक- मत होणे शक्य नाही असे आम्हास वाटते. अमूक एका माणसाचा आग्रह सत्याग्रह आहे किंवा दुराग्रह आहे हे त्या आग्रहाच्या सिद्धिसाठी योजिलेल्या साधनांवर अवलंबून नसते. ते सर्वस्वी ज्या त्या कार्याच्या नैतिक स्वरूपावर अवलंबून असते. ते कार्य जर सत्कार्य असेल तर त्या बाबतीत धरलेल्या आग्रहास सत्याग्रह म्हटलेच पाहिजे. आणि तेच जर असत्य असेल तर त्या बाबतीत त्याने धरलेल्या आग्रहास दुराग्रह म्हणावे लागेल. हिंसा, अहिंसा ही केवळ आग्रहाच्या सिद्धिची साधने आहेत. जसे कर्माच्या किंवा कर्त्याच्या अनुरोधाने क्रियापदाचे रूप बदलते तसे काही साधनाच्या अनुरोधाने आग्रहाचे नैतिक स्वरूप बदलत नाही. कारण एखाद्या दुराग्रहीने आपला आग्रह पार पाडण्यास अहिंसेचा मार्ग पत्करला म्हणून त्याच्या दुराग्रहाला सत्याग्रह म्हणता यावयाचे नाही किंवा एखाद्या सत्याग्रहीने सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी हिंसा केली एवढ्यावरून त्याच्या सत्याग्रहाला दुराग्रह म्हणता येणार नाही. तसे जर झाले तर गीतेत श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनास सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी जो हिंसेचा ` मार्ग पत्करण्यास भाग पाडले त्यास काय म्हणावे? तो पापात्मा होता काय? तसे म्हणण्यास कोणी हिंदू तयार होईल असे वाटत नाही; व इतर कोणी तसे म्हणण्यास तयार झाला तरी त्याचे म्हणणे सर्वानाच पटेल, असे म्हणता यावयाचे नाही. कारण अहिंसा परमो धर्म : असे जरी सांगण्यात येते तरी सर्वच ठिकाणी अहिंसा धर्म पाळणे शक्य नाही. डोळ्यांनी न दिसले तरी तर्काने ज्याचे अस्तित्व समजते असे सूक्ष्म जंतू या जगात इतके भरले आहेत की,