अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ७३
असे म्हणावे लागते. कारण त्यांच्या सत्याग्रहाची जी रीत आहे त्यामुळे इतर प्राण्यांच्या शरीरावर जरी आघात होत नसला तरी त्यांचे मन दुखविले जाते याबद्दल काही शंका नाही. गांधींच्या सत्याग्रही माणसाने मनुष्यवध जरी केला नाही तरी तो आपल्या आग्रहामुळे प्रतिपक्षाच्या मनाची शांतता भंग करतोच. असे असता आपल्या सत्याग्रहात हिंसा मुळीच होत नाही, असे जे म. गांधींचे म्हणणे आहे ते अपुरे आहे, असे म्हणणे प्राप्त होते. खरे म्हटले असता शक्य असेल तोवर अहिंसां व जरूर पडेल तर हिंसा, असे धोरण सत्याग्रही माणसांनी ठेवणे हे सिद्धिच्या. दृष्टीने रास्त आहे, इतकेच नव्हे तर नीतीच्या दृष्टीनेही ते प्रशस्त आहे. . गांधींनी अहिंसेवर जो इतका भर दिला आहे तो केवळ गांधी हे अहिंसावादी आहेत म्हणून नव्हे. भर देण्याचे त्यांचे कारण अगदी निराळे आहे. म. गांधी आपल्या सत्याग्रहाच्या मीमांसेत. सत्य म्हणजे काय ? व ते कसें ठरविता येईल ? याबद्दल आपणास काही निश्चयात्मक अशी एकादी कसोटी उभी करता येत नाही असे म्हणतात. ज्याला आपण सत्याग्रह म्हणू त्यालाच लोक दुराग्रह म्हणू शकतील असे त्यांना वाटते. व हे त्यांचे मत त्यांनी हंटर कमिटीसमोर जी कैफियत लिहून दिली आहे तिच्यांत स्पष्टपणे नमूद केले आहे. जेथे सत्याबद्दल प्रामाणिकपणे मतभेद असू शकेल, तेथे हिंसा करणे रास्त होणार नाही असे त्यांचे मत आहे आणि एवढ्याच कारणामुळे त्यांनी आपल्या सत्याग्रहाच्या साधनातून हिंसेला फाटा दिला आहे. यावरून उघड होत आहें की, जर कार्याच्या सत्यतेबद्दल द्विधा मत नाही अशी जर कोणी त्यांची खात्री करून दिली तर त्याप्रित्यर्थ आरंभिलेल्या सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी हिंसा-करावी लागली तर गांधी त्यास मोडा घालणार नाहीत. हे जे विवेचन केले आहे ते एवढ्याच करिता की, हिंसा ही सत्याग्रहाच्या नैतिक स्वरूपास बाधक नाही. यापेक्षा या मुद्याची जास्त चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. कारण सत्याग्रह पार पाडण्यास, हिसा करण्यास तात्त्विक दृष्ट्या हरकत नसली तरी आजच्या परिस्थितीत तसे करण्याची कोणास सवड नाही. या देशातील सारी घ्रजा निःशस्त्र असल्यामुळे सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी अहिंसेचा एकच मार्ग काय तो खुला आहे. आणि सत्याग्रहास सिद्ध झालेल्या अस्पृश्यांनी याच एका उपायावर सारी भिस्त ठेवून चालणे प्राप्त आहे. शिवाय तो उपाय अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्यास अपुरा आहे असे मानण्यास अजून तरी काही अनुभवाची साक्ष घेता येण्यासारखी नाही कारण अस्पृश्यता निवारणार्थ सत्याग्रहाची मोहीम नुकतीच सुरू होत आहे. तेव्हा जो सत्याग्रह करावयाचा तो अहिंसात्मक रीतीचा असणार, याशिवाय त्यात दुसरे काहीच नाही असे सर्वानीच पक्केपणी ध्यानात ठेविले पाहिजे. .