७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आता हा सत्याग्रह कोणा विरूद्ध करावयाचा ? याची चर्चा करणे प्राप्त आहे. अस्पृश्यांची जी समान हक्कांची मागणी आहे ती स्पृश्य लोकांकडे आहे. कारण जर त्यांचे न्याय हक्क देण्यास कोणी विरोध करीत असतील तर ते स्पृश्य लोकच होत. अर्थात, जो सत्याग्रह करावयाचा तो स्पृश्य लोकांविरूद्धच करावयाचा असे अस्पृश्य लोकांना वाटणे शक्य आहे. परंतु तो समज सर्वस्वी खरा नाही. समजा, उद्या अस्पृश्य लोक एखाद्या सार्वजनिक तळ्यावर अथवा एखाद्या सार्वजनिक देवालयात आपले हक्क बजाविण्याचा आग्रह धरून गेले व स्पृश्य लोक त्यांना प्रतिकार करण्याचा हेतू धरून आडवे झाले, तर पुढे काय होणार हा प्रश्न विचारात घेतल्याशिवाय सत्याग्रह कोणाविरूद्ध करावयाचा आहे याचा पूर्णपणे समज होणे शक्य नाही. अस्पृश्य लोक सत्याग्रहास प्रवृत्त झाले आणि अपेक्षिल्याप्रमाणे जर स्पृश्य लोक आडवे आले आणि त्यांच्या अपकृत्यामुळे शांततेचा भंग होण्याचा जर रंग दिसून आला तर शांतता राखण्यासाठी सरकारला या लढ्यात पडावे लागेल. कारण शांतता राखणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य आहे. आणि सरकार जर या लढ्यात पडले तर ते | कोणते धोरण स्वीकारील हे जाणून घेतल्याशिवाय सत्याग्रह कोणाविरूद्ध करावयाचा, हे ठरविता येणे शक्य नाही. सरकारने जर अस्पृश्य लोकांची बाजू घेतली आणि न्याय्य हक्कांची अंमलबजावणी करणाऱ्या लोकास सरकारच्या दीर्घ बाहूची मदत देणे हे न्याय आहे व त्या न्यायाप्रमाणे जर सरकार वागले तर हा प्रश्न चुटकीसरसा सुटून जाणार आहे. परंतु तसे न होता सरकारने जर उलट खाल्ली व सत्याग्रही अस्पृश्यांनाच जर ते म्हणू लागले की, तुम्ही नव्या नव्या क्लुप्त्या काढून भलभलत्याच गोष्टी करू लागलात आणि तेणेकरून शांततेचा भंग होत आहे, सबब आम्ही तुम्हास मनाई करतो. असा हुकूम सरकारने काढला तर पुढे काय होणार ? अर्थात् असे जर झाले तर अस्पृश्यांस जो सत्याग्रह करावा लागणार आहे तो दिसावयास जरी स्पृश्यांविरूद्ध असला तरी अखेर तो सरकारविरूद्ध होणार आहे हे उघड आहे. तेव्हा या सत्याग्रहाची जबाबदारी काय आहे हे अस्पृश्यांनी ओळखून असावे हे बरे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे या सत्याग्रहात आपला देवळात किंवा तळ्यावर जाण्याचा आग्रह शेवटास नेण्यास अस्पृश्य लोकांना सरकारी हुकूम मोडल्याशिवाय गत्यंतर नाही व सरकारी हुकूम मोडल्याबद्दल सरकार सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्य लोकांस तुरूंगात ' टाकल्याखेरीज राहणार नाही. एकूण सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्य लोकांनी या कामी आपणास वेळ पडल्यास तुरूंगवासही पत्करावा लागणार आहे. अशी पूर्ण जाणीव ठेवूनच सत्याग्रहास आपली कंबर बांधावी. खरे म्हटले असता