१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 117

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ७५

अस्पृश्यता ही इतकी अपमानकारक गोष्ट आहे की, तिच्या निवारणार्थ काहींचे प्राण खर्ची पडले तरी हरकत नाही. आपल्या स्पर्शाने अपवित्र झालेली वस्तू गोमूत्र शिंपडून शुद्ध होते असे स्पृश्य लोक मानितात. स्वधर्माच्या मनुष्याच्या स्पर्शाने जे विटाळते ते पशूचे मूत्र शिंपडल्याने शुद्ध होते. या अत्यंत तिरस्करणीय विचारात ती मानवी स्पर्शाच्या भ्रष्टतेची कल्पना अधिक धिःकारणीय आहे किंवा ती पशूच्या मूत्राने शुद्ध करण्याची भावना अधिक धिःकारणीय आहे हे जरी सांगणे कठिण असले तरी एक गोष्ट उघड आहे की, पशूंच्या मलमूत्रात जेवढे पावित्र्य आहे तेवढे देखील पावित्र्य स्पृश्यांच्या दृष्टीने अस्पृश्यांतील माणसात नाही. ही स्थिती जगण्यासारखी आहे असे कोणाही स्वाभिमानी माणसास वाटणार नाही. जगणे हाच काही जगातील पुरूषार्थ नव्हें. जगण्याच्या नानापरी आहेत. काकबळी खाऊन कावळेही पुष्कळ वर्ष जगतात परंतु त्यांच्या जीवितात पुरूषार्थ आहे असे कोणीही म्हणणार नाही. आज नाही उद्या, निदान शंभर वर्षांनी तरी मुत्यू हा कोणासच चुकत नाही; तर मग त्याबद्दल डर किंवा रड कशाला ? हे शरीर बोलून चालून नाशिवंत. आत्म्याच्या कल्याणार्थ जे काही या जगात करावयाचे असते त्यास नाशिवंत मनुष्य देह हेच काय ते एक साधन असल्यामुळे '' आत्मनाम सततं रक्षेत दारैरपि धनैरपि !' बायकामुले किंवा संपत्ती यापेक्षा आपल्या स्वतःचे पहिल्याप्रथम रक्षण करावे असे शास्त्रात सांगितले आहे खरे. तथापि, हा दुर्लभ पण नाशिवंत मानव देह खर्ची घालून यापेक्षाही अधिक शाश्वत अशी एकादी वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी उदाहरणार्थ देशासाठी, सत्यासाठी, ब्रीदासाठी, व्रतासाठी, यशासाठी; अब्रुसाठी अथवा भूतमात्रासाठी अनेक महापुरुषांनी अनेक प्रसंगी कर्तव्याच्या अग्नित आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आम्हाला तरी असे वाटते की, महाभारतात वीरपत्नी विदुला हिने आपल्या पुत्रास जसे सांगितले की, अंथरूणावर पडून कुजत किंवा शंभर वर्ष निरर्थक जीवित घालविण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास तरी बरे, असेच दरेक अस्पृश्य मातेने आपल्या पुत्रास सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. परंतु इतके मोठे असिधाराव्रत पाळण्यास अस्पृश्यास कोणीच लावित नाही. फक्त तुरुंगात जाण्यास तयार व्हा या पलिकडे त्यांच्यापासून दुसऱ्या कोणत्याही स्वार्थत्यागाची मागणी नाही. आणि तितकेही जर होत नसेल तर अस्पृश्य लोक पुरुष नसून हिजडे आहेत असेच म्हणावे लागेल. कारण महाभारतात एके ठिकाणी असे सांगितले आहे की,-

एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी ।

क्षमावान्निरमर्षश्च नैव स्त्री. न पुनः पुमान्‌ ॥