१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 119

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ७७

सत्याग्रहाच्या सिद्धीचा विचार करिताना सत्याग्रह कोणाविरुद्ध करावयाचा हे जाणणे जितके जरूर आहे तितकेच तो सत्याग्रह कोणी करावयाचा याचाही विचार करणे अवश्य आहे. सत्याग्रह हा आपले मानवी हक्क प्राप्त करून घेण्याचा उपाय तर आहेच. तो उपाय फलदायक होण्यास जेवढ्या म्हणून अस्पृश्य वर्गातील स्त्री पुरुषास त्यात भाग घेता येईल त्या सर्वांनी त्यात भाग घेणे सिद्धिच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतु आमच्या मते सत्याग्रह हा फक्त व्यावहारिक उपाय आहे इतकेच नसून तो एक प्रकारची आत्मंशुद्धी करून घेण्यास आरंभिलेला यज्ञ आहे. त्या यज्ञात दरेक अस्पृश्याने उडी टाकून आपणास शुद्ध करून ` घ्यावे. स्पृश्य लोक अस्पृश्य लोकास अपवित्र व अशुद्ध मानतात ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच अस्पृश्य लोक आपणा स्वतःस अशुद्ध व अपवित्र मानून वागतात ही गोष्ट खरी आहे. आतापर्यंत स्पृश्य लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे ते सांगतील ते करण्याची आणि वागवतील तसे वागण्याची अस्पृश्य लोकांना सवय लागून गेलेली आहे. स्पृश्य लोक श्रेष्ठ आहेत, आपण कनिष्ठ आहोत, ते आपले नायक आहेत आपण त्यांचे किंकर आहोत या भावनेचे पूट जे अस्पृश्य लोकांच्या मनावर-बसून गेलेले आहे, त्यामुळेच अस्पृश्यता टिकून राहिलेली आहे. पूट जाळून टाकल्याशिवाय आत्मसन्मानाची भावना अस्पृश्य लोकात जागृत होणार नाही व ती जागृत झाल्याशिवाय अस्पृश्यतानिवारण होणार नाही. या आत्मशुद्धीच्या दृष्टीने दरेक अस्पश्याने या सत्याग्रहात भाग घेणे जरूर असले तरी संसाराच्या उपाधीत सापडलेल्या अस्पृश्य लोकांना ही आत्मशुद्धी करून घेण्यास प्रत्यक्षपणे सत्याग्रहात भाग घेता येईल किंवा नाही, याबद्दल शंका वाटणे अगदी साहजिक आहे व झालेच तर फारच थोड्या लोकांना यात भाग घेता येईल व पुरेशा लोकांनी सत्याग्रहात भाग घेतला नाही तर त्यापासून विशेष फायदा होईल असे आम्हास वाटत नाही. कारण, सत्याग्रह हा दुराग्रही माणसांस सत्याचा अवलंब करण्यास भाग पाडण्याचा एक मार्ग आहे व अशा दुराग्रही माणसास त्राहि त्राहि वाटेल इतक्या मोठ्या प्रमाणावर सत्याग्रह झाला नाही तर तो आपला दुराग्रह सोडणार नाही. म्हणून आमची अशी सूचना आहे की, त्याचबरोबर संसाराच्या. उपाधीतून मुक्त झालेल्या किंवा उपाधीत न सापडलेल्या ५००० अस्पृश्य तरूणांचे एक सत्याग्रह दल तयार करावे व त्या दलामार्फत जेथे जेथे सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल तेथे तेथे सत्याग्रह करण्यात यावा. ही योजना जर अंमंलात आणली तर सत्याग्रहाच्या तयारीत काही न्यून उरणार नाही व एवढ्या मोठ्या ५००० सत्याग्रही दलाचा मारा करिता आला तर सत्याग्रहाच्या सिद्धीबद्दल कोणालाच शंका राहणार नाही. परंतु अशाप्रकारचे दल तयार होण्यास द्रव्याचे साह्य झाले पाहिजे.