१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 125

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ८३

ही दुःखकारक बातमी ऐकून सर्वांनाच फार वाईट वाटले तरी पण अशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकरांनी परिषदेचे काम मोठ्या धैर्याने व नेटाने पुढे चालवून आपले खरे लोकनायकत्व प्रगट केले. सभेचे काम १ वाजेपर्यंत चालून त्यात खालील ठराव पसार करण्यात आले.

ठराव १ ला.

आपल्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. आंबेडकर ह्यांचे वडील बंधू श्री. बाळारामजी हे एकाएकी वारल्याची दुःखकारक वार्ता आताच आलेली ऐकून ह्या सभेस अत्यंत दु:ख होत आहे व कै. बाळारामजी आंबेडकर ह्यांच्या शोचनीय निधनामुळे ही सभा १० मिनिटे आपले काम बंद ठेवित आहे.

ठराव २ रा.

(अ) येथील वयोवृद्ध व सन्माननीय पुढारी ना. गणेश श्रीकृष्ण खापर्डे, कौन्सिल

ऑफ स्टेटचे सभासद व श्री. अंबादेवी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष यांचे जे पत्र

सत्याग्रह कमेटीचे अध्यक्ष श्री. गवई, एम. एल. सी. यांनी सभेपुढे मांडले आहे, ह्याचा विचार करून ही सभा सत्याग्रह कमेटीस अशी सूंचना करते की, ना. खापर्डे यांनी तडजोड करण्याची जी इच्छा दर्शविली आहे व तिच्या सफलतेसाठी वेळ द्यावा अशी जी पत्रात मागणी केली आहे, त्या पत्राचा विचार करून आणि ना. खापर्डे याबाबतीत शक्य ती खटपट करणार आहेत असा विश्वास ठेवून या कामी त्यांना मुदत देण्यासाठी १५ तारखेस होणाऱ्या सत्याग्रहाची तारीख पुढे ढकलण्यास हरकत नाही.

(ब) तथापि सत्याग्रहाची ता. १५ नोव्हेंबरपासून तीन महिन्याच्या पुढे कोणत्याही सबबीवर हा सत्याग्रह लांबणीवर टाकण्यात येऊ नये.

(क) या सभेचे सत्याग्रह कमेटीस असे सांगणे आहे की, त्यांनी अस्पृश्यांचा देवळात अंतिम सीमेपर्यंत जाण्याचा पूर्णपणे जो हक्क आहे, त्याला बाध येइल अशी कोणतीही अट या तडजोडीच्या बाबतीत मान्य करू नये.

(ड) ह्या सभेचे सत्याग्रह कमेटीस असे सांगणे आहे की, पुढे करावा लागणारा सत्याग्रह शक्यतोपर्यत सामुदायिक पद्धतीने करण्यात यावा.

वरील सर्व ठरावांवर बऱ्याच वक्त्यांची अनुकूल, प्रतिकूल भाषणे होऊन वरील सर्व ठराव प्रचंड बहुमताने पसार करण्यात आल्यावर शेवटी श्री. गवई, नाईक व अमृतकर ह्यांनी योग्य शब्दात अध्यक्षांचे व पाहुणे मंडळीचे आभार मानल्यावर सभेचे कार्य डॉ. आंबेडकर व शाहू छत्रपती ह्यांच्या जयजयकारात संपले.