२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 127

१५ | |
अस्पृश्योन्नततीचा आर्थिक पाया

पूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे शनिवार ता. २६ आणि रविवार ता. २७ नोव्हेंबर १९२७ रोजी सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे २ रे अधिवेशन सोलापूर मुक्कामी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. परिषदेला सोलापूर जिल्ह्यातील दरेक खेड्यातील प्रतिनिधी आले होते. ता. २६ रोजी शनिवारी पाच वाजल्यापासूनच लोकांची अलोट गर्दी जमण्यास सुरुवात झाली. सर्वाचे डोळे डॉ. आंबेडकर साहेबांच्या येण्याचे वाटेकडे लागून राहिले होते. बरोबर सात वाजता डॉ. आंबेडकर साहेब आपल्या परिवारातील मंडळीसह सभामंडपात आले. त्यांच्या येण्याबरोबर सर्व मंडळीने उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. नंतर मुलांनी ईशस्तुतिपर गायन म्हटल्यावर _ परिषदेचे स्वागताध्यक्ष जिवाप्पा ऐदाळे यांनी परिषदेच्या कामास सुरवात केली व त्यांचे स्वागतपर भाषण झाले.

नंतर अध्यक्ष डॉ. आंबेडकर साहेब. यांचे सुविचार परिप्लुत असे भाषण झाले. डॉ. आंबेडकर यांचे भाषण चालू असता सर्व लोक अगदी चित्रासारखे तटस्थ होऊन शांत चित्ताने ऐकत होते. त्यांचे भाषण अगदी साधे पण मार्मिक आणि परिणामकारक झाले. ते म्हणाले, |

सद्गृहस्थ हो!

गेल्या मार्च महिन्याच्या १८ तारखेस महाड येथे जी अस्पृश्य वर्गाची एक परिषद भरली होती त्या परिषदेने आपले सार्वजनिक हक्क बजाविण्याच्या हेतूने महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन पाणी घेण्याचा जो उपक्रम केला त्यामुळे ती परिषद अस्पृश्योन्रतीच्या इतिहासात चिरस्मरणीय झाली आहे, याबद्दल काहीच शंका नाही. कारण स्थानिक स्पृश्य लोकांनी प्रतिकार करून चवदार तळ्यासारख्या सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरू देणार नाही, असा दुराग्रह धरला त्या वेळीच महाड म्हणजे आपण पानिपत समजतो व ते पुन्हा काबीज केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे त्या परिषदेच्या चालकांनी तत्क्षणी जाहीर केले. इतकेच नव्हे, तर प्रसंग पडल्यास या कार्याच्या सिद्धीसाठी सत्याग्रह करून बोलला बोल साच करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली.

बहिष्कृत भारत : २३ डिसेंबर १९२७.