८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ही वार्ता प्रसिद्ध झाल्याबरोबर अस्पृश्य लोकास स्पृश्य लोकांकडून उपदेश करण्यास सुरुवात झाली. महाडचे प्रकरण घडते न घडते तोच ज्यांना काहीच कळत नसले, तरी हिंदुस्थानातील 'हवा पाणी कळते' असा दंभ धरणाऱ्या चित्राव शास्त्र्यांनी मोठ्या गंभीर शब्दात सांगितले की, “स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या लोकसंख्येतील फरक या चळवळी करताना केव्हाही ध्यानात घेतला पाहिजे. आपल्या मराठी भागात तरी तीन भाग स्पृश्य आणि चवथा अस्पृश्यांचा अशी स्थिती आहे. स्पृश्यांमध्ये कितीही भेद व विरोध असले तरी अस्पृश्यतेबद्दल सर्वाचे एकच मत आहे. याचा अनुभव महाड वगैरे स्थळी नित्यशः येतच आहे आणि अस्पृश्यांची उपजीविका सर्वस्वी अशा वृत्तीच्या स्पृश्यांच्या हातात आहे. ज्या दिवशी अस्पृश्यांची उपजीविका स्वतंत्र होईल व ते स्वत:च्या मानवी हक्कांकरिता स्वत:चे जीवितही वेचण्यास तयार होतील तो दिवस अस्पृश्यांच्या काय पण हिंदू व हिंदुस्थान यांच्या दृष्टीनेही काही वेगळाच असेल यात शंका नाही. एका हाताने हिंदू संघटनेच्या कार्याकरिता व दुसऱ्या हाताने स्वजातीच्या भ्रेष्ठत्त्वासाठी रण माजवणाऱ्या मुंबईतील एका साप्ताहिक पत्रकर्त्यनिही अशाच प्रकारचा भेसूर सूर काढला आहे. हे संपादक महाशय म्हणतात, '“ सत्याग्रह हा शब्द कानाला फार गोड़ लागतो ही गोष्ट खरी आहे पण सत्याग्रह हे दुधारी शस्त्र आहे हेही तितकेच खरे आहे. सत्याग्रहाच्या जोरावर डॉ. आंबेडकर हे उद्या आपल्या अनुयायांसह महाडच्या तलावाचे पाणी पितील, पण या त्यांच्या क्रियेची प्रतिक्रिया जेव्हा गावोगाव सुरू होऊ लागेल तेव्हा गरीब बिचाऱ्या अस्पृश्यांची वैलातून काढून चुलीत टाकल्याप्रमाणे जी रिथती होईल तिला जबाबदार कोण! अस्पृश्यांचा एक दोन ठिकाणचा सत्याग्रह सिद्धिस गेल्याने उभ्या हिंदुस्थानातली अस्पृश्यता नष्ट होईल अशी डॉक्टर साहेबांची समजूत आहे काय? आमचे तर असे ठाम मत आहे की, डॉक्टर साहेबांच्या या सत्याग्रहाचे पर्यवसान भयंकर सामाजिक कलहात व कदाचित रक्तपातातही होणार!”
जसे या प्रांतातील लोक महाड येथे सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्य लोकास ही धोक्याची सूचना देत आहेत तसेच वऱ्हाड प्रांतातील लोक अमरावती येथील अंबा देवीच्या देवळात जाण्यासाठी सत्याग्रह करण्यास सिद्ध झालेल्या अस्पृश्य लोकांसही देत आहेत, असे पुणे येथे प्रसिद्ध होणाऱ्या 'स्वराज्य' पत्रावरून 'समजते.