८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
साधा निषेध याच्या पलिकडला असून ज्या स्पृश्य लोकांविरूद्ध हा सत्याग्रह करण्यात येत आहे त्या लोकाना त्यांच्या हाती “ फाजील उत्साही “ अस्पृश्यांना शासन करून वठणीवर आणण्यास कोणते शस्त्र आहे याची आठवण करून देण्यासाठी हा इषारा आहे, असे आम्हास वाटते. कारण ज्या लोकांची या गोष्टीला खरी सहानुभूती आहे व अस्पृश्यांची उपजीविका स्पृश्यांच्या हातात असून, स्पृश्य लोक आपला आश्रय बंद करून अस्पृश्यांना सत्याग्रहापासून परावृत्त करतील असे त्यांना पूर्णपणे माहीत आहे त्यांनी जसा अस्पृश्यांना स्पृश्यांच्या हाती कोणते शस्त्र आहे याची जाणीव ठेवा! असा इशारा दिला तसाच स्पृश्यांनाही सत्याग्रहासारखे सत्त्कार्य हाणून पाडण्यासाठी हाती असलेल्या शस्त्राचा दुरुपयोग कराल तर खबरदार! असाही इशारा दिला असता. पण ते यांना सुचले नाही. खरे म्हटले असता सत्याग्रहास प्रतियोग म्हणून बहिष्कार टाकला जाईल हे अस्पृश्य लोकाना सांगत सुटण्याचे काहीच प्रयोजन नाही. ज्या अस्पृश्यांनी सत्याग्रहाची चळचळ सुरू केली आहे, त्यांना या भविष्याची प्रथमपासूनच पूर्ण कल्पना होती. पण या बहिष्काराला भ्यावे कोणी? ज्याला ध्येय नाही तोच Asa. ज्याच्या डोळ्यापुढे धगधगीत ध्येय आहे तो कदापि भिणार नाही. कारण, ध्येयवादी लोकांस पूर्णपणे माहीत असते की, कोणतेही ध्येय कितीही हलके असले तरी ते साध्य करण्यास तपाची आवश्यकता असतेच. हे ध्येय जितके उच्च असेल तितकी ते मिळविण्याकरिता करावी लागणारी तपश्चर्याही खडतर प्रकारची पाहिजे. तपश्चर्येवाचून कोणीही आपले ध्येय गाठल्याचा इतिहासात पुरावा नाही. केवळ सुख आणि स्वास्थ्य हे माणसाचे जीवित कर्तव्य आहे असे नाही. तसे जर असते तर मनुष्यत्त्वाला साजेशी तेजस्वी कार्ये या जगात घडून आली नसती. पशूंना साध्या स्वास्थ्यामध्ये समाधान वाटणे शक्य आहे. पण मनुष्य आणि पशू यामध्ये आहार, निद्रा, भय वगैरे शारीरिक धर्म जरी सामान्य असले तरी बुद्धी ही खास देणगी परमेश्वराने फक्त मनुष्यालाच दिली आहे. ती जेव्हा जागृत नसेल तेव्हा मनुष्य हा पशुच असतो व साध्या स्वास्थ्यामध्ये तो सुख मानू शकतो. परंतु तीच बुद्धी जागृत होऊन जिवंतपणाची जाणीव झालेल्या मनुष्याला ही स्मशानशांतता पटणे शक्य नाही. त्याला साधे स्वास्थ्य हवे किंवा आपले बुद्धीने ठरविलेले ध्येय हवे याचा निर्णय करावा लागतो. अस्पृश्य वर्ग
आज जागृत झाला आहे व त्यास साधे स्वास्थ्य हवे किंवा समता हवी, या
दोहोंपैकी कोणत्यातरीपक्षी निश्चय करण्याची वेळ येणार होती; ती आज आली आहे व त्याप्रमाणे समता प्राप्त करून घेण्याचा त्याने निश्चय केला आहे आणि आमची खात्री आहे की जागृत झालेली अस्पृश्य जनता आपली गती कुंठित