९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
समाज त्यांचे पोषण करतो अशी त्यांनी खोटी समजूत तरी करून घेतली असावी. हिंदू समाजाची रचना इतर समाजाप्रमाणे विनिमयावरच झालेली आहे. अशा परिस्थितीत कोणी कोणावर उपकार करतो असे मानण्याचे मुळी कारणच नाही. धन्याने नोकरास चाकरीस ठेविले तर तू मजवर काही उपकार करीत नाहीस असे धनी त्यास मोठ्या दिमाखाने म्हणतो. परंतु मी उपकार करीत नाही हे तर खरेच, परंतु तू देखिल मजवर काही उपकार करीत नाहीस असे नोकरालाही धन्याला ठासून सांगता येण्यासारखे आहे. जे काम स्वतःला करता येते ते काम इतरांकडून कोणीही सहसा करून घेत नाही. आपल्याकडून न होणारे काम करून घेण्यासाठीच परक्याची जरूरी लागते. धन्याने संबंध सोडला तर नोकरलोक हवालदील होतील. पण नोकराने संबंध तोडला तर जवळ पैका असूनही धन्याची कुचंबना होईल. एकूण, एकाला दुसऱ्याची जरुरी भासते, म्हणून हा परस्परांचा संबंध जुळून येतो आणि स्वार्थाच्या पायावर उभारलेला हा संबंध सहजासहजी कोणाच्याने तोडवत नाही. कारण, त्यात उभयपक्षाची हानी होते. तोच न्याय स्पृश्य व अस्पृश्य यांच्या संबंधास लागू आहे. अस्पृश्य लोक जे स्पृश्यांची नोकरी करितात ते आपण स्पृश्यांना उपकृत करतो, असे म्हणत नाहीत. तसेच स्पृश्यांनीही त्यांना आपण पोसतो अशी घमेंड मारू नये. उभयतांचा संबंध निव्वळ स्वार्थाचा आहे. एकमेकांचे एकमेकावाचून अडते, म्हणून दोघेही पडतात. अशा व्यवस्थेने सांधलेल्या लोकांना परस्परांवर बहिष्कार टाकणे शक्य नाही व टाकलाच तर तो फार दिवस टाकणे अशक्य आहे. § = ६
स्पृश्य व अस्पृश्य यांच्यातील आर्थिक संबंध जरी परस्परातील स्वार्थाच्या भावनेवर अधिष्ठित झालेला असला तरी या दोनही वर्गाच्या धारणपोषणशक्तीत थोडा बहुत फरक आहे हे कबूल करणे प्राप्त आहे व त्यामुळे एक दुसऱ्याला जितका मारक होऊ शकतो तितका पहिला दुसऱ्याला मारक होऊ शकत नाही. ज्यांची धारणपोषणशक्ती कमी प्रतीची आहे, त्यांनी ज्यांची धारणपोषणशक्ती श्रेष्ठ प्रतीची आहे, त्यांच्याशी झगडण्याचा जर प्रसंग आला तर तो प्रसंग त्यांना शेवटास नेणे जड जाते. कारण, “WHA ge बांधुनी मग कोठे तगावे”' अशी भ्रांत ज्यांची धारणपोषणशक्ती कमी प्रकारची असते त्यांना पडते व तशी भ्रांत पडल्यामुळे ज्यांची धारणपोषणशक्ती श्रेष्ठ असते त्यांना विरोध करून एखादे शाश्वतहित प्राप्त व्हावयाचे असते ते देखील त्यांना सोडून द्यावे लागते. याचे उत्कृष्ट उदाहरण महाभारतात पहावयास सापडते. कौरवपांडवांची सैन्ये कुरुक्षेत्रावर लढाईस सज्ज झाली असता युद्धास प्रारंभ करण्यापूर्वी भीष्म, द्रोण व शला अशा