९२ डॉ. बावासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे.
जबरदस्त आहे की, त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात पसरुन ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील. आता महारांची काय गत आहे हे पाहू. महारांना त्यांचा म्हणून जातीचा धंदा असा काही नाही. अगदी शेवटच्या पायरीचे का होईनात पण ते राजपुरुषच आहेत. कारण सरकारी नोकरीवरतीच त्यांची उपजीविका आहे. सरकारी नोकराला कोणाचे घेणे नाही कोणाचे.देणे नाही. त्यालाही बहिष्काराचे भय नाही, असे महाराँनाही म्हणता येण्यासारखे आहे. पण ते केव्हा ? सरकारी नोकरी भली आणि आपण भले असे महारांना म्हणता येईल तेव्हा. परंतु त्यांच्या दुर्दैवाने त्यांना आज तसे म्हणता येत नाही असे आम्हास वाटते. याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे महारांचे वतन हे. होय. या वतनामुळे महार लोक स्पृश्याधीन झाले ` आहेत. त्यांना स्पृश्याधीन होण्याचे कारण असे की, ज्यांच्या हाताखाली महारांना नोकरी करावयाची असते ते अधिकारी सारे स्पृश्य लोकच असतात. हे लोक महारांपासून सरकारी नोकरी घेण्यापुरताच आपल्या अधिकाराचा उपयोग करतात असे नाही ते आपल्या अधिकाराचा उपयोग महार लोक पायरीने वागतात की नाही याची खबरदारी ठेवून त्यांनी पायरी सोडली तर त्यांना शासन करण्याकडेही त्या अधिकाराचा उपयोग.करतात. सरकारी नोकरी वेळचे वेळी न केल्यामुळे महारांना शासन झाल्याचे एक उदाहरण देता आले तर त्याच्या जोडीला पाटलाची लाकडे फोडली नाहीत म्हणून, मामलेदाराच्या घोड्याला गवत घातले नाही म्हणून, कुळकर्ण्याची. जमीन नांगरली.नाही म्हणून, गावात रयतेला जोहार घातला नाही म्हणून, गावात भाकरी मागण्याचे सोडून दिले म्हणून, मेलेल्या जनावरांचे मांस खाण्याचे बंद केले म्हणून, अंगात चांगला पोषाख घातला म्हणून महारांना दंड झाल्याची हजारो उदाहरणे देता येतील. या गोष्टीचा आणि सरकारी नोकरीचा काही संबंध नाही. एकादा मुसलमान पाटील किंवा पारशी कुळकर्णी असता तर वतन म्हणजे महारांना सुखाची सावली झाली असती. त्यांनी जर दंड केला असता तर सरकारी नोकरीत कुचराई केल्यामुळेच केला असता. महाराने चांगला पोषाख केल्यामुळे, भाकरी मागण्याचे सोडून दिल्यामुळे किंवा मृतमांस खाण्याचे बंद केल्यामुळे केला नसता. कारण, महारांनी गलिच्छपणा टाकून सुव्यवस्थितपणे राहण्याचा उपक्रम केल्यामुळे त्यांची काही मानहानी झाली किंवा महार मातला असे त्यास वाटले नसते. परंतु तेच पाटील कुळकर्ण्याचे जोडपे स्पृश्य हिंदुधर्मीयांचे असल्यामुळे त्याला महाराने पायरी सोडली तर संताप येतो आणि संतापाच्या भरात हे जोडपे गुजगोष्टी करावयास लागून वतनामुळे प्राप्त झालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून महार सरकारी काम करीत नाहीत, असा खोटाच रिपोर्ट मामलेदाराकडे रवाना करते.