अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ९५
केल्यापासून एवढाच फायदा आहे असे नाही त्याशिवाय आमच्या मते दुसराही
आणखी महत्त्वाचा फायदा आहे. उपजताच महाराच्या मुलाच्या पोटात
शिवाशिवीचे भय बसते. ह्याला शिवशील, त्याला शिवशील हा नित्याचा शब्द त्याच्या कानावर पडत गेल्याने ते मूल स्वतःस जे अपवित्र व हीन मानू लागते ते शेवटपर्यंत तसेच मानून राहाते. हे त्याच्या मनावरील दडपण एकदा बसले की ते कायमचे राहते व त्याचे मन असे कमकुवत झाल्यामुळे त्याच्या हातून पुढे कोणतेच पुरुषार्थाचे कार्य होत नाही. या नव्या वस्तीत वाढलेली महारांची मुले निर्भयपणे वाढतील. शिवाशिवीची भाषा त्यांच्या कानावर पडण्याचा कूयोग येणार नाही. आपण इतर कोणापेक्षा कमी आहोत व इतर कोणी आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत असे त्यांना वाटणार नाही व ती मनाने दुबळी होणार नाहीत. हा लाभ फार महत्त्वाचा आहे व त्याबरोबरच जर शेतीसारख्या स्वतंत्र उपजीविकेचे साधन हाती येत आहे तर याचा फायदा महार लोकांनी अवश्य घ्यावा. या नव्या वसाहती घडवून आणण्यास दोन प्रकारची मदत पाहिजे आहे. (१) सरकारचे सहाय्य पाहिजे. (२) महार लोकांनी गाव सोडण्यास तयार झाले पाहिजे. पैकी सरकारचे सहाय्य मिळणे कठीण नाही. म्हैसूर संस्थानात अस्पृश्य वर्गातील लोकांना प्रत्येक कुटुंबास ७ एकर जमीन देऊन त्यांची निराळी वसाहत करण्याचे निश्चित झाले आहे. आपल्या इलाख्यातही इंग्रज सरकारने बेरड लोकांची अशाच प्रकारची वसाहत करण्याचे योजिले आहे. तेव्हा तीच योजना महार लोकास लागू करण्यास सरकार माघार घेईल असे वाटत नाही. प्रश्न इतकाच आहे की, महार लोक आपला गाव सोडून आपली निराळी वसाहत करण्यास तयार होतील काय?
सर्वच महार लोकांना शेतीवर उपजीविका करता येईल इतके मोठे क्षेत्र सापडणे कठीण आहे. तेव्हा शेतीला जोडून दुसरा काही तरी धंदा महार लोकांनी करणे अवश्य आहे. महार जात ही धंदेवाईक जात नाही. अर्थात तिला जो धंदा करता येईल तो धंदा तिने करण्यास काही हरकत नाही. एवढी गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की, पैशाच्या व अनुभवाच्या अभावी श्रेष्ठ प्रतीचे किफायतशीर धंदे या जातीतील लोकांना करता येणे शक्य होणार नाही. शक्य झालेच तर एखादा कनिष्ठ प्रकारचा धंदा हाती घेता येईल. परंतु ब्राह्मण्याच्या भुताटकीते पछाडलेले महार लोक हीन धंदा पत्करण्यास तयार होतील असे संभवत नाही. ज्या धंद्याला घाण नाही किंवा जो अमूक एका जातीचा धंदा होऊन बसला नाही असा एखादा धंदा करता येण्यासारखा असला तर तो करण्यास कदाचित महार लोक उद्युक्त होतील. आमच्या मते अशा प्रकारचा एकच एक धंदा म्हणजे खादी विणण्याचा आहे व महार लोकांना आमची शिफारस आहे की, तुम्ही खादी
विणा.