हक्क बजावण्यासाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे १०१
येथे आली त्या कंपनीला राज्यस्थापना करण्याकरिता आपल्या लोकांनी मदत केली आणि जोपर्यंत आपले लोक पलटणीत होते तोपर्यंतच आपली भरभराट होती. पलटणीचा दरवाजा बंद होताच आपली स्थिती खालावत चालली. आज आपल्या लोकांना पोलिसात घेत नाहीत व इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची मारामार पडत आहे. पुण्यात आपल्या वर्गापैकी एक ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे त्याला नोकरी मिळण्याकरिता मी आज दोन वर्ष सरकारबरोबर झगडत आहे. याच्या आड सरकारातीलच काही वरिष्ठ अधिकारी आहेत हे मी जाणून आहे. महाडला जो आम्ही सत्याग्रह करणार आहोत आणि ज्याकरिता तुम्ही आम्हास आर्थिक मदत केली त्याबद्दल तुम्ही असे समजू नका की, आम्ही तुमच्या गाडीचे घोडे आहोत व त्याकरिता तुम्ही ही चंदी देता. हे काम सर्वांचे आहे. महाडच्या चवदार तळ्यावर जो सत्याग्रह करावयाचा तो स्पृश्य हिंदू आपणास अपवित्र मानतात म्हणून. महाडला अस्पृश्यांना पाण्याचा दुष्काळ आहे म्हणून नव्हे, तर स्पृश्य हिंदू व आपण हे बरोबरीचे आहो. आपला तो हक्क आहे आणि हा हक्क बंजावण्याकरिता सर्वानी सिद्ध झाले पाहिजे. तेथे कोणताही अनिष्ट प्रकार होणार नाही अशी माझी खात्री आहे. म्हणून तुम्ही अगदी निर्भय मनाने या सत्याग्रहात भाग घ्यावा, अशी माझी विनंती आहे.