१७
महाड सत्याग्रह परिषद
महाडच्या संग्रामाची पूर्वतयारी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक प्रसिद्ध केले की, अस्पृश्यांनी सत्याग्रहासाठी जय्यत तयार रहावे. हा संदेश देणारे पत्रक येणेप्रमाणे :-
'' बहिष्कृत हितकारिणी सभेच्या विद्यमाने
महाड येथे ता. २५ डिसेंबर १९२७ पासून सत्याग्रह सुरू होणार !
महाड सत्याग्रहास मदत करा.
जेणे कुलवंत म्हणावे | तेही वेगी हजीर व्हावे ||
हजीर न होता कष्टावे । लागेल पुढे lal
सर्व अस्पृश्य ज्ञातिबंधूंस कळविण्यात येते की, ता. २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड मुक्कामी एक सभा भरविण्याचे ठरले आहे. गेल्या मार्च महिन्याच्या १९ तारखेस महाडास सभा भरविण्यात आली असता पुन्हा त्याच ठिकाणी दुसरी सभा भरविण्याचे कारण काय, असे कदाचित काही लोकांकडून विचारण्यात येईल. त्यास उत्तर असे की, महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा उपक्रम आपल्या ज्ञातिबंधुंनी केला असता स्पृश्य लोकांनी त्यांना हरकत करण्याच्या हेतूने मारामार केली. तीत स्पृश्य लोकातील मारामारी करणाऱ्या गुंडांना ४/४ महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. हा कोर्टाचा निकाल दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाचा आहे.
स्पृश्य लोकांच्या मनात जी एक भावना होती की, अस्पृश्यांना चवदार तळ्यावर येऊ न देणे हा आपला अधिकार आहे, या भावनेला आता काही आधार उरला नाही. आता पुन्हा भ्रमिष्टासारखे जर ते आपल्या आड येतील तर, त्यांना पुन्हा तुरुंगाचे दार पाहावे लागेल यात संशय नाही. त्याचप्रमाणे आपल्या अस्पृश्य ज्ञातिबंधुंच्या मनात जी एक भावना होती की, आपल्याला चवदार तळ्यावर जाण्याचा हक्क नाही, ते चूक असून आता आपला हक्क प्रस्थापित झाला आहे, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. तसे नसते तर ज्यांनी आपणास तळ्यावर जाण्यास हरकत केली त्यास शिक्षा न होता आपणासारख्या तळ्यावर