२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 147

महाड सत्याग्रह परिषद १०५

पुष्कळ साहाय्य झाले, त्यातल्यात्यात रा. पत्की यांचा तर फारच उपयोग झाला. त्यांची मदत नसती तर परिषदेच्या सामग्रीसाठी लागणारे सामान मुळी मिळालेच नसते. परिषदेला पुष्कळशा गोष्टी उसनवार घेऊन थोड्या खर्चात कार्यभाग आटोपता आला असता. पण गावात लोकमत प्रतिकूल असल्याकारणाने सर्वच वस्तू तात्पुरत्या कामासाठी देखील खरेदी कराव्या लागल्या, तेणेकरून परिषद खर्चाची झाली. परंतु जेथे भाराभर सुवर्ण दिले असताही काही मिळणे शक्य नव्हते, तेथे इतकी उत्तम व्यवस्था करण्यात आली हीच मोठी आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे व त्याबद्दल रा. चित्रे व पत्की यांना द्यावा तेवढा धन्यवाद थोडाच आहे. त्यांच्या जोडीला , पुण्याहून सुभेदार घाडगे, रा. थोरात व भानगरहून रा. भानगरकर जमेदार हे ता. २४ रोजी महाडास येऊन दाखल झाले होते. जमलेल्या प्रतिनिधीस लष्करी शिस्त लावणे, एवढ्या समुदायाची जेवणाची व्यवस्था करणे वगैरे अवघड कामे सुभेदार घाटगे यांच्यावर सोपविण्यात आली होती. ती त्यांनी इतक्या शिताफीने व धडाडीने पार पाडली की, सगळे लोक थक्क झाले. सभेचे महत्त्व ओळखून १९ तारखेपासूनच कलेक्टर, जिल्ह्याचे पोलीस सुपरिंटेंडेंट वगैरे अधिकारी लोक यांनी महाडास येऊन तळ दिला होता. २३ तारखेपासून प्रतिनिधी. येण्यास सुरवात झाली व २५ तारखेस तर हा समुदाय दहा हजारांवर झाला होता. मध्यंतरी कलेक्टर साहेबांकडून मनाई हुकूम मिळत नाही असे कळल्यावरून अस्पृश्य वर्गास काहीतरी करून तळ्यावर जाण्यास प्रतिबंध करावा या हेतूने महाडच्या स्पृश्य लोकांनी डॉ. आंबेडकर व इतर चार अस्पृश्य लोकांवर महाड येथील दिवाणी कोर्टात फिर्याद केली होती व कोर्टास अर्ज करून २५ तारखेस अस्पृश्य लोकांनी तळ्यावर जाऊ नये, असा तात्पुरता मनाई हुकूम मिळविला होता. या कारवाईमुळे कलेक्टरसाहेब जरी नाराज होते तरी दिवाणी कोर्टाचा अपमान होऊ नये, यास्तव त्यांना आपल्या पूर्वीच्या धोरणात फरक करणे भाग झाले. तथापि, त्यांनी अखेरपर्यंत सामदामाचाच अवलंब केला व क्रि. प्रो. कोडच्या १४४ कलमाखाली आपल्या अधिकारात काढता येणारा मनाइ हुकूम काढण्याच्या भरीस ते पडले नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. मात्र २३ तारखेपासून परिषदेच्या HU सकाळ संध्याकाळ फेरे घालून, लोकांना उपदेश करून, सत्याग्रहापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु उपदेश केल्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या कलेक्टराचे ऐकाल किंवा डॉ. आंबेडकरांचे ऐकाल असा जेव्हा जेव्हा ते प्रश्‍न करीत तेव्हा तेव्हा आम्ही डॉ. आंबेडकरांचे ऐकू असेच

उत्तर त्यास मिळे.

डॉ. आंबेडकर यांचे महाडला प्रयाण

मुंबईहून डॉ. आंबेडकर व दोन-अडिचशे मंडळी ता. २४ रोजी सकाळी पद्मावती बोटीने निघाली. या मंडळीत मुंबईचे रा. शिवतरकर, धोंडी नारायण गायकवाड़, कांबळे, गंगावणे, वनमाळी, पुण्याचे राजभोज, नाशिकचे भाऊराव गायकवाड,