२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 148

१०६ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

वगैरे अस्पृश्य पुढारी होते. त्यांच्याबरोबरच स्पृश्य लोकांपैकी सोशल सव्हिस लीगचे कार्यकर्ते श्री. सहस्त्रबुद्धे व समतासंघाचे प्रधान बंधू सामील झाले होते. ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचे संपादक रा. देवराद नाईक यांना आजारीपणामुळे येता आले नाही. सत्याग्रही मंडळी धक्क्यावर पोहोचण्याचे पूर्वीच त्यांच्या अभिनंदनार्थ तेथे बरीच मंडळी जमलेली होती. त्या मंडळीतफे पुढाऱ्यांना हारतुरे घालण्यात आले व ' महाड सत्याग्रहकी जय ' अशा घोषणांनी किनारा दुमदुमून गेला. पदमावती ९ वाजता मुंबईहून सुटली. ती संध्याकाळी साडेपाच वाजता हरेश्वर बंदरात येऊन पोहोचली. वाटोवाट व बंदरोबंदरी ' सत्याग्रहकी जय ' असा जयघोष सारखा चालूच होता.

कोळमांडला येथील स्वागत

महाडला धरमतरहून जाणे अगदी सोपे होते. परंतु मोटरवाले लोक कदाचित संप करतील व तसे झाल्यास मुंबईच्या लोकास ५०/५५ मैल महाड़ास पोहोचणे अशक्य होईल यास्तव धरमतरचे वाटेने न जाता दासगावाच्या वाटेने जाण्याचा निश्चय मुंबईच्या मंडळीने केला होता. ही गोष्ट कोळमांडला येथील लोकास माहीत होती व त्याचप्रमाणे त्यांनी एक स्वागत कमिटी स्थापन करून मुंबईहून येणाऱ्या सत्याग्रही मंडळाचे स्वागत करण्याची सर्व तयारी केली होती. या स्वागत कमिटीचे अध्यक्ष रा.पांडूरंग बाबाजी मांडलेकर हे होते. कोळमांडल्यासारख्या खेडेगावी जी व्यवस्था त्यांनी केली होती ती इतकी उत्तम होती की, तशी व्यवस्था मुंबईसारख्या ठिकाणी देखील झाली नसती. या ठिकाणी मंडळीने सुखाने रात्र घालविली व सकाळी अल्पहार करून मंडळी आठ वाजता दासगावला जाण्यास ' अंबा ' बोटीत चढली. दुतर्फा डोंगर व मधून खाडी आणि आजुबाजूला हिरवी गर्द झाडी असा हा खाडीतील अत्यंत रमणीय असा देखावा सकाळच्या सूर्यप्रकाशात मनाला आनंदवीत होता. ' अंबा ' साडेबारा वाजता दासगाव बंदरास पोहोचली. तेथे सुमारे तीन हजार लोक महाडला जाण्यास डॉ. आंबेडकरांची व मुंबईकरांची वाट पाहात बसले होते. त्याचप्रमाणे कुलाबा जिल्ह्याचे पोलीस सुपरिटेन्डेन्ट मि. फेरेन्ट, पोलीस इन्सपेक्टर, फौजदार वगैरे पोलीस अधिकारी हजर होते. पोलीस सुपरिंटेन्डेन्ट साहेब व डॉ. आंबेडकर यांनी एकमेकास कुशल प्रश्‍न विचारल्यानंतर आपणास कलेक्टर साहेब मि. हूड यांनी भेटण्यास बोलाविले आहे, अशा आशयाचे पत्र त्यांनी दिले. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर व श्री. सहस्त्रबुद्धे हे Gre साहेबांच्या मोटारीत बसून महाडला गेले. जाण्यापूर्वी दासगाव येथे जमलेल्या लोकास एकत्र करून शिस्तीने व शांततेने आपल्या पाठीमागून महाडला यावे, अशी डॉ. आंबेडकर यांनी सर्वांना ताकीद दिली.